Join us

Coronavirus: 'ते' कोरोनाशी लढत होते, पण मोबाईलवरील मेसेज त्यांना क्षणाक्षणाला मारत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 15:38 IST

Coronavirus कोरोनामुळे महाराष्ट्रातील तिसरा रुग्ण मंगळवारी दगावला. पुण्यातील रुग्णांनी वापरलेली कॅब त्यांनी घरी येण्यासाठी वापरल्याने त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती.

ठळक मुद्देरिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे कळताच लोकांनी त्यांच्यावर शाब्दिक वार करण्यास सुरुवात केली.एवढेच नाही तर त्यांच्या कुटुंबालाही लोकांनी वाळीत टाकल्यासारखी वागणूक देण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : मुंबईतील कोरोनाचा रुग्ण असलेल्या वृद्धाचा मंगळवारी मृत्यू झाला. या वृद्धाचा मुलगा आणि पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र ते कोरोनाशी लढा देत असताना त्यांना त्यांच्या आसपासचा समाज बहिष्काराची वागणूक देत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रातील तिसरा रुग्ण मंगळवारी दगावला. पुण्यातील रुग्णांनी वापरलेली कॅब त्यांनी घरी येण्यासाठी वापरल्याने त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. मात्र, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे कळताच लोकांनी त्यांच्यावर शाब्दिक वार करण्यास सुरुवात केली. त्यांना तेव्हापासूनच तिरस्काराचे मेसेज पाठविण्यात येऊ लागले. एवढेच नाही तर त्यांच्या कुटुंबालाही लोकांनी वाळीत टाकल्यासारखी वागणूक देण्यास सुरुवात केली आहे.

१ मार्चला पुण्यातील संक्रमित जोडपे आणि त्यांची लहान मुलगी मुंबईतून कॅब करून गेली होती. त्याच कोरोना संक्रमित कॅबने हे वृद्ध मुंबई विमानतळावरून घरी आले होते. यामुळे चालकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनाही प्रशासनाने शोधले होते.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मयत वृद्धाला अनेक वर्षांपासून ओळखणाऱ्या त्यांच्या पाहुण्यांनी, सोसायटीतील लोकांनी त्यांना त्रास दिला. कोरोना व्हायरस पसरविण्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात, असे बोलायला, संदेश पाठवायला सुरुवात केली. एके दिवशी तर त्यांना त्यांचाच मृत्यू झाल्याचा मेसेज मिळाला. यामुळे त्यांना व कुटुंबाला खूप यातना झाल्या.

शेजाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच सोसायटीमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्यांनी येणे-जाणेच बंद केले. तसेच त्यांची मुलगी आणि नातीलाही लोकांनी वाळीत टाकले. हे लोक या सोसायटीमध्ये २० वर्षांपासून राहत आहेत. सोसायटीबाबतही अफवा पसरविली जात आहे. त्यांना शिवाशीव करायची नाही, असे आजुबाजुचे लोक म्हणत आहेत. काही दुचाकीस्वार मुले सोसायटीकडे येऊन कोरोना. कोरोना असे आरडून जोरजोरात आवाज करत पळून जातात, असे या सोसायटीमध्ये राहणाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबईपुणेमृत्यू