Coronavirus:...पण केंद्राने कापलेला ‘हा’ निधी महाराष्ट्रात येणार का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 16:12 IST2020-04-07T16:10:59+5:302020-04-07T16:12:49+5:30
लॉकडाऊनमध्ये २४ तास काम करणारे पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, मिडिया, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स असे असंख्य लोक असतील त्यांचे आभारी आहे.

Coronavirus:...पण केंद्राने कापलेला ‘हा’ निधी महाराष्ट्रात येणार का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल
मुंबई – केंद्राच्या काही गोष्टी पटल्या नाहीत तर आम्ही टिका करतो. कालच त्यांनी आमचे पगार कापले. त्याबद्दल त्यांचे मनापासून स्वागत केले. शरद पवार गेले १५ दिवस प्रत्येक संवादात काटकसर करण्याचा सल्ला देत आहेत. आमचे पगार कापून काही लोकांना मदत होत असेल तर मनापासून स्वागत आहे. पण खासदार निधी काढून घेतला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे.
फेसबुक लाईव्हद्वारे कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना त्यांनी मनसोक्त उत्तर दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, एक गोष्ट कळत नाही की, खासदाराला ५ कोटी रुपये मतदारसंघात खर्चासाठी येतात. ते विकास कामासाठी वापरले जातात आता हा सगळा निधी केंद्राने काढून घेण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला, विरोध करायचा नाही. अशा काळात सरकारला गरज असेल तर समजू शकते पण केंद्राने कापलेला निधी महाराष्ट्रात येणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच महाराष्ट्रात निधीचं काय होणार हा विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे. उद्या पंतप्रधान आमच्याशी बोलणार आहेत त्यावेळी ते स्पष्टीकरण देतील किंवा प्रश्न नक्की विचारु, जीएसटी बरोबर महाराष्ट्राला केंद्राकडून बराच निधी यायचा आहे. राज्यांना किंवा केंद्राला अडचणी आहेत परंतु महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. यावरही पंतप्रधान बोलतील शिवाय व्हिजनही सांगतील अशी अपेक्षा सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.
तसेच महाराष्ट्रात शरद पवारांनी टास्कफोर्स करण्याची विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली आहे. मुख्यमंत्री सतत सर्वांच्या संपर्कात आहेत. ते बोलतात त्यावेळी सर्वांना आधार मिळतो. सरकारचं काम कसं सुरू आहे हे ही जनतेला समजतं आहे. ही राजकारणाची वेळ नाही. एकमेकांच्या हाताला धरून महाराष्ट्र व देश या संकटावर मात कसा करेल ती ही वेळ आहे त्यामुळे घरीच रहा. आजची देशसेवा हीच आहे असे मत सुप्रिया सुळेंनी मांडले.
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये २४ तास काम करणारे पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, मिडिया, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स असे असंख्य लोक असतील त्यांचे आभारी आहे. लॉकडाऊनमुळे ग्रामीण व शहरी भागात लोकांना अडचणी येत आहेत याची जाणीव आहे परंतु आपल्या घराबाहेर न पडणे हेच आपल्या सगळ्यांचे मोठे योगदान आहे. मीसुद्धा आयुष्यात पहिल्यांदाच घरात इतका वेळ राहिले आहे असे सांगतानाच ७ दिवस शिल्लक आहेत. लॉकडाऊन वाढवायचा जो काही निर्णय असेल तो सरकार घेईल आणि तो तुमच्या माझ्या हिताचा असेल त्यामुळे मी फारसा विचार करत नाही असंही त्या म्हणाल्या.
दिल्ली पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह
दिल्लीत ज्या घटना घडल्या याचं वाईट वाटते. दिल्लीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आले त्यावेळी दंगल झाली. अशावेळी कमिशनर काय करत होते. त्याच्या आठ दहा दिवसात मरकजची घटना झाली त्याच कमिशनरने परवानगी दिली. प्रशासनाचे नक्की लक्ष आहे कुठे आणि प्रशासनाने दहा दिवसाच्या अंतरात या दोन गोष्टी होवूच कशा दिल्या. ट्रम्प यांची एवढी मोठी व्हिआयपी व्हिजीट असताना दंगल होते आणि मग मरकज होते अशावेळी पोलिस व प्रशासन करत काय होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला.