CoronaVirus In Maharashtra: राज्यात कठोर निर्बंध लागणार; आगामी एक-दोन दिवसांत घोषणा करणार, राजेश टोपेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 16:07 IST2021-04-01T16:00:58+5:302021-04-01T16:07:46+5:30
CoronaVirus In Maharashtra: सध्या २ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चा राजेश टोपे यांनी फेटाळून लावल्या आहेत. (The state will impose strict restrictions; said maharashtra helth minister Rajesh Tope )

CoronaVirus In Maharashtra: राज्यात कठोर निर्बंध लागणार; आगामी एक-दोन दिवसांत घोषणा करणार, राजेश टोपेंची माहिती
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला लॉकडाऊनच्या उपाययोजना करण्याचे दिलेले आदेश, भारतीय जनता पक्ष यांचा लॉकडाऊनला असलेला विरोध या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (health minister rajesh tope on rising corona cases and lockdown preparation)
टीव्ही ९ मराठी या वृ्त्तवाहिनीशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं स्पष्ट केलं आहे. सध्या २ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चा राजेश टोपे यांनी फेटाळून लावल्या आहेत. लॉकडाऊनसंदर्भात तुर्तास तरी चर्चा सुरु आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
लॉकडाऊन करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र याबाबत सरकारची चर्चा सुरु आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते. राज्यात ५० टक्के लॉकडाऊन लागणार, हे वृत्त राजेश टोपे यांनी फेटाळून लावले. पण सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्बंधाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असा इशारा देखील राजेश टोपे यांनी दिला आहे. (The state will impose strict restrictions; said maharashtra helth minister Rajesh Tope)
राजेश टोपे पुढे म्हणाले की, गर्दीच्या ठिकाणी नागरिक कमीत-कमी १५ दिवस गेले नाही, तर कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होऊ शकते. यासोबतच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे देखील राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात बुधवारी कोरोनाच्या ३९ हजार ५४४ रुग्णांचे निदान झाले असून, तब्बल २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख १२ हजार ९८० झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ६४९ झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या साडेतीन लाखांवर गेली असून, तीन लाख ५६ हजार २४३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दिवसभरात २३ हजार ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २४ लाख ७२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्राण ८५.३४ टक्क्यांवर गेले असून, मृत्युदर १.९४ टक्के असल्याची नोंद आहे.
राज्यात आज 39544 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 23600 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2400727 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 356243 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.34% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 31, 2021
मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर
मुंबईत बुधवारी ५ हजार ३९४ रुग्ण आढळले असून, १५ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख १४ हजार ७१४ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ६८६ झाला आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८५ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर आला आहे. २४ ते ३० मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.३७ टक्के असल्याचे दिसून आले.