Join us

coronavirus: कोरोनाच्या रुग्णांचे आकडे लपवून मला पाप करायचे नाही आहे, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 14:05 IST

उद्या डेथ रेट वाढला तर बाहेर बिंग फुटणार आहे, मला यात पाप नाही करायचं. जे खरं आहे ते खरं आहे. आपण सत्याला सामोरे जाऊ, जे आहे ते लोकांसमोर ठेऊ!

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राजधानी मुंबईसह राज्यातील विविध भागात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. दरम्यान, राज्यातील सरकारकडून कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीबाबत लपवाछपवी केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या आरोपाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाच्या संकटातून आपल्याला बाहेर पडायचे आहे, त्यामुळे कोरोनाची एकही केस लपवायची नाही, असे मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीबाबत काही वेळा तफावत दिसून आली आहे. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की,‘’ मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे की एकही केस लपवायची नाही, कारण आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे. लपवून काय होणार आहे? उद्या डेथ रेट वाढला तर बाहेर बिंग फुटणार आहे, मला यात पाप नाही करायचं. जे खरं आहे ते खरं आहे. आपण सत्याला सामोरे जाऊ, जे आहे ते लोकांसमोर ठेऊ! लोकांना मदतीची किंवा सहकार्याची विनंती करू, कारण हे त्यांच्यासाठीच चाललेलं आहे.  आणि त्यांनी सहकार्य केलं तर मला खात्री आहे की आपण यशस्वी ठरू. मी पहिलंच बोललोय की तुम्ही खबदरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो. मी आतापर्यंत जबाबदारी घेतलेली आहे,’’

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६५ हजार १६८ झाली आहे. काल एका दिवसात राज्यात कोरोनाचे २ हजार ९४० नवे रुग्ण सापडले, तर ९९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा २ हजार १९७ वर पोहोचला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारराजकारण