Join us

Coronavirus : गो कोरोना, गो म्हणत मुंबईकरांनी उभारली गुढी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 16:03 IST

Coronavirus : काही ठिकाणी गुढी उभारताना रांगोळी देखील काढण्यात आली. या रांगोळीतून गो कोरोना, गो असे संदेश देण्यात आले.

 मुंबई - कोरोनाचे सावट आज गुढीपाडव्यावर देखील दिसून आले आणि गेल्या कित्येक वर्षांपासून काढण्यात येत असलेल्या नववर्ष स्वागत मिरवणुकांना/यात्रांना ब्रेक लागला. पुरेशी खबरदारी म्हणून मुंबईकरांनी बुधवारी भल्या पहाटे नववर्ष स्वागत मिरवणूक/यात्रा न काढता गुढी उभारली. आणि देवाकडे, निसर्गाकडे हे नवे वर्ष आरोग्यासाठी लाभदायक असू दे, अशी मनोभावे प्रार्थना केली.

मुंबई शहर आणि उपनगरात प्रत्येक वर्षी स्वागत यात्रा काढत गुढी उभारली जाते. मुंबईकर वेशभूषा साकारत अवघ्या जगाचे, देशाचे लक्ष वेधून घेतात. यात्रेतून सामाजिक संदेश दिला जातो. यावेळी मात्र कोरोनाचे सावट गुढीपाडव्यावर दिसून आले. गिरगाव, लालबाग, परळ, माहीम, दादर, वरळी, सायन, कुर्ला, विलेपार्ले, अंधेरी, चांदीवली, घाटकोपर, चेंबूर, मुलुंड, बोरिवली, कांदिवली आणि दहिसर या ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली नाही. केवळ ठिकठिकाणी गुढी उभारण्यात आली. चाळीचे परिसर, इमारत परिसर, नाके, मंडळे अशा विविध ठिकाणी ज्येष्ठ मंडळी यांनी एकत्र येत गुढी उभारली.

काही ठिकाणी गुढी उभारताना रांगोळी देखील काढण्यात आली. या रांगोळीतून गो कोरोना, गो असे संदेश देण्यात आले. विशेषतः कोरोनाचे संकट टळू दे, अशी प्रार्थना मुंबईकरांनी देवाकडे, निसर्गाकडे केली. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी शक्य असेल तशी गुढी उभारली जात होती. याव्यतिरिक्त मुंबईकरांनी आपल्या घरात देखील गुढी उभारत हे कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना केली.

गुढीपाडव्यानिमित्त घराघरात गोडाचे जेवण करता यावे म्हणून सकाळी ठिकठिकाणी साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. दूध, दही, श्रीखंड हे साहित्य घेण्यासाठी मुंबईकर गर्दी करत होते. मात्र बहुतांश ठिकाणी साहित्य उपलब्ध नसल्याने मुंबईकर निराश होत होते. याच वेळी बाजारात तैनात असलेले पोलीस मुंबईकरांना साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी करू नका, असे आवाहन सातत्याने करत होते. दरम्यान, नेहमीप्रमाणे मुंबईकरांनी यावेळी देखील सोशल मीडियावर एकमेकांना पाडव्याच्या शुभेच्छा देत कोरोनाचे संकट टळू दे, असे म्हणणे मांडले.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनाची लढाई जिंकले, 1 लाख लोक बरे होऊन घरी परतले

Coronavirus : बापरे! …तर भारतात 13 लाख लोकांना होऊ शकतो कोरोना, शास्त्रज्ञांचा इशारा

Coronavirus : पंतप्रधान मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, खऱ्या हिरोंसाठी केली प्रार्थना

Coronavirus: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! देशातील रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद

Coronavirus : कोरोनाचा कहर! जगभरात तब्बल 18,892 लोकांना गमवावा लागला जीव

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबईगुढीपाडवा