Join us
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरपोच वस्तू द्या,मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 07:24 IST

वयोवृद्ध, अपंग किंवा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुंबई -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्ध, अपंग आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभतेने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. शासनाने यासाठी एक कार्यपद्धती निश्चित केली असून त्यानुसार अशा व्यक्तींना सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ही घरपोच सेवा मिळणार आहे.

 वयोवृद्ध, अपंग किंवा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  संबंधित गरजू व्यक्तींने हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर ही सेवा त्यांना उपलब्ध होऊ शकेल.

       यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून संपर्क अधिकाऱ्यांची (नोडल ऑफिसर) नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रनिहाय समाजसेवी संस्था निश्चित करण्यात आल्या आहे. अत्यावश्यक वस्तू जसे- अन्नधान्य, औषधे अशा बाबींचा पुरवठा करणाऱ्या संस्था या स्वयंसेवी संस्थांशी जोडण्यात आल्या आहेत.

     पोलीस यंत्रणेच्यावतीनेही यासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्था, सेवा पुरवठादार, औषध विक्रेते, घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्ती यांना  पोलीस यंत्रणेच्यावतीने प्रवेशपत्र देण्यात आलेले आहेत.

   स्वयंसेवी संस्था हेल्पलाईनवर प्राप्त झाल्याप्रमाणे वयोवृद्ध, अपंग व्यक्तींना आवश्यक ते सहाय्य करतील तसेच या व्यक्तींची यादी संबंधीत नोडल अधिकाऱ्यांना सोपवून पोलिस यंत्रणेशी समन्वय राखण्याचे काम करणार आहे. सहाय्यासाठी गरजूंना संबंधित महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा लागेल.  मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी 1800 221 292 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.  ती सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहतील.  या मोहिमेसाठी राज्य समन्वयक म्हणून शासनाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे या काम पहात आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरे