Coronavirus: Corona uncontrolled in Andheri, Dahisar, Mulund, growth rate above average | coronavirus: अंधेरी, दहिसर, मुलुंडमधील कोरोना आटोक्यात येईना , रुग्णवाढ सरासरीपेक्षा अधिक

coronavirus: अंधेरी, दहिसर, मुलुंडमधील कोरोना आटोक्यात येईना , रुग्णवाढ सरासरीपेक्षा अधिक

मुंबई : वरळी, धारावी, वडाळा, माटुंगा, भायखळा या हॉटस्पॉट विभागात महापालिकेने कोरोनावार नियंत्रण मिळविले आहे. तर पश्चिम उपनगरातील अंधेरी ते दहिसर तसेच मुलुंड आणि भांडुपमध्ये ‘मिशन झीरो’मार्फत उपाययोजना सुरू आहेत. मात्र दहिसर आणि मुलुंड हे दोन विभाग महापालिकेसाठी आव्हान ठरत आहेत. या दोन विभागांत रुग्णवाढीचे प्रमाण अद्याप मुंबईतील सरासरीपेक्षा अधिक आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीपासून दक्षिण मुंबईत अधिक होता. झोपडपट्ट्यांमध्ये  कोरोनाचा प्रसार रोखणे एक मोठे आव्हान ठरले. मात्र ‘चेसिंग द व्हायरस’ या मोहिमेतून प्रमुख हॉटस्पॉटमध्ये कोरोनाचा प्रभाव नियंत्रणात आला आहे. त्याचवेळी अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर येथे रुग्णांची संख्या वाढत गेली. पूर्व उपनगरात भांडुप, विक्रोळी, कांजूर मार्ग आणि मुलुंड येथे रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी २० दिवसांहून कमी होता.

या विभागासाठी पालिका प्रशासनाने दोन आठवड्यांपूर्वी मिशन झीरो ही मोहीम आणली आहे.या मोहिमेअंतर्गत कोरोना रुग्ण सापडलेल्या भागांमध्ये घरोघरी जाऊन मोबाइल दवाखाना व्हॅनची टीम संशयितांची तपासणी करीत आहे. आतापर्यंत एक हजारांहून अधिक लोकांचा स्वॅब चाचणीकरिता नेण्यात आला आहे.यापैकी ४० कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या मोहिमेचा प्रभाव काही ठिकाणी दिसून येत आहे. तर दहिसर आणि मुलुंडमध्ये रुग्णवाढ रोखण्यासाठी पालिकेचे पथक अथक प्रयत्न करीत आहे.

मोहिमेचे लक्ष्य

दोन ते तीन आठवडे युद्धपातळीवर  या भागातील रुग्णांची तपासणी नियमित केली जाणार आहे. यातूनच कोरोना संशयित रुग्णांना त्वरित वेगळे करून त्याच परिसरात त्यांची चाचणी (स्वॅब टेस्ट) केली जाणार आहे. बाधितांचा वेळीच शोध घेऊन उपचार करण्यावर यात भर असणार आहे.

कोरोनाविषयीची माहिती पुरवून रुग्णांसह जनतेची काळजी घेणे, नागरिकांच्या मनामधील अवास्तव भीती कमी करणे, दैनंदिन कामकाज करण्यासाठी नागरिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जागृती करण्यात येत आहे.

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ १.६० टक्के आहे. मुलुंडमध्ये हे प्रमाण ३.६ टक्के आणि दहिसरमध्ये ३.३ टक्के आहे.

सोमवारपर्यंत मुलुंडमध्ये एकूण ३१९९ बाधित झाले आहेत. यापैकी १७४८ बरे झाले आहेत. तर ९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दहिसरमध्ये एकूण ३,२८५ बाधित झाले आहेत. यापैकी १,५९९ बरे झाले आहेत. तर ९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

English summary :
Corona uncontrolled in Andheri, Dahisar, Mulund, growth rate above average

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: Corona uncontrolled in Andheri, Dahisar, Mulund, growth rate above average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.