Join us

coronavirus: अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर पोहोचले घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 15:46 IST

कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर अशोक चव्हाण यांना उपचारांसाठी नांदेडहून मुंबईत आणण्यात आले होते. दरम्यान, कोरोनामुक्त झाल्यानंतर अखेर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी सांभाळत असलेल्या अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर अशोक चव्हाण यांना उपचारांसाठी नांदेडहून मुंबईत आणण्यात आले होते. दरम्यान, कोरोनामुक्त झाल्यानंतर अखेर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यावर बिकट परिस्थिती ओढावली आहे. त्यातच राज्य सरकार आणि प्रशासनमधील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. अशोक चव्हाण हे कोरोनाचा संसर्ग झालेले राज्य सरकारमधील दुसरे मंत्री ठरले होते. चव्हाण यांच्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. दरम्यान, आव्हाड यांनीही कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.

महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण हे मुंबईतून नांदेडला गेले होते. तिथे त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर अशोक चव्हाण यांना उपचारासाठी नांदेडहून मुंबईला आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतच उपचार सुरू होते.विधान परिषद निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी ते मुंबईला आले होते. या निवडणुकीनंतर ते पुन्हा नांदेडला परतले. नांदेडला येऊन त्यांनी स्वत: होम क्वारंटाइन करून घेतलं होतं. त्यांनी कुटुंबापासून स्वत:ला वेगळं ठेवलं होतं.  नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ते उपचारासाठी आज नांदेडहून मुंबईकडे रवाना झाले होते.

 

टॅग्स :अशोक चव्हाणमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र सरकार