CoronaVirus: 25 policemen died in 16 days in state | CoronaVirus: राज्यात १६ दिवसांत २५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

CoronaVirus: राज्यात १६ दिवसांत २५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पोलिसांनाही बसताना दिसत आहे. गेल्या १६ दिवसांत २५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर आतापर्यंत एकूण ३८९ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेली कोविड रुग्णालये, कोविड सेंटर, प्रतिबंधित क्षेत्र, अशा ठिकाणच्या बंदोबस्तासह अन्य सर्व प्रकारची कर्तव्ये राज्य पोलीस दल स्वतःचा जीव धोक्यात घालून काटेकोरपणे बजावत आहे. कर्तव्य बजावत असतानाच राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र पोलीस सेवेतील अधिकारी आणि अंमलदारांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा होण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत राज्यात ३८९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील २५ मृत्यू हे मागील १६ दिवसांतील आहेत. यात मुंबई पोलीस दलातील ३ पोलिसांचा समावेश आहे, तसेच पुणे, धुळे, नाशिकसह एसआरपीएफच्या जवानही आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा फटका पुन्हा पोलिसांना बसताना दिसत आहे.
मी लवकरच कामावर येईन म्हणत सोडले प्राण
सायकलिस्ट अशी ओळख असलेले राज्याच्या सायबर विभागातील पोलीस हवालदार हर्षल रोकडे (३६) यांचा रविवारी कोरोनाने मृत्यू झाला. १० एप्रिलपासून त्यांच्यावर सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा होत होती. दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर लवकरच कामावर परतणार असल्याचे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले हाेते. मात्र, शनिवारी त्यांची ऑक्सिजनची पातळी घसरली आणि अचानक प्रकृती खालावल्याने रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांसाठी कोविड सेंटर सज्ज
कालिना येथील कोळे कल्याण येथे पोलिसांसाठी २५० बेडचे कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. ते पोलिसांसाठी सज्ज असून, अन्य ठिकाणीही पोलिसांना विशेष सुविधा देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.


अडीच महिन्यांत १० हजार जणांना कोरोना, ६० पाेलिसांचा मृत्यू
गेल्या अवघ्या अडीच महिन्यांत राज्य पोलीस दलातील तब्बल १० हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६० अधिकारी-अंमलदाराना प्राण गमवावे लागले.
या कालावधीत सक्रिय काेराेनाबाधित पोलिसांचे प्रमाण तब्बल १३ पटीने वाढले. यावर्षी १ फेब्रुवारीला कोरोनाचे केवळ ३१२ रुग्ण होते. आजअखेर हा आकडा ३,८७४ इतका वाढला आहे. पाेलिसांमध्ये झपाट्याने संसर्ग पसरत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
गेल्या वर्षांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील पोलीस फ्रंटलाईनवर लढत आहेत. त्यांनाही त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे  ‘लाेकमत’ला मिळालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

पुरेपूर दक्षता बाळगावी
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले असले तरी त्यांना स्वतःच्या सुरक्षेबाबतही पुरेपूर दक्षता बाळण्याची सूचना केली आहे. आजाराचे थोडेही लक्षण दिसल्यास किंवा थकवा जाणवल्यास तातडीने तपासणी तसेच योग्य काळजी घेण्याबाबत घटकप्रमुखांना कळविले आहे. लसींचे दोन्ही डोस पूर्ण करण्याबाबत कार्यवाही केली जात आहे.   
            - संजय पांडे, पोलीस महासंचालक

अशी झाली लागण
nगेल्या ८२ दिवसांत मुंबईसह राज्यभरातील सुमारे १० हजार पोलिसांना या विषाणूची लागण झाली.
n१ फेब्रुवारी २०२१ राेजी पोलीस दलात एकूण २९ हजार ५९९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी २८ हजार ९३७ पूर्णपणे बरे झाले. ३३०जणांचा मृत्यू झाला होता तर अवघे ३१२ सक्रिय रुग्ण होते.
nमात्र २२ एप्रिलअखेरपर्यंत हा आलेख झपाट्याने वाढत गेला. एकूण ३८ हजार ९९९ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एकूण ३४,७३५ जण बरे झाले असून एकूण मृत्यूची संख्या ३०० पर्यंत वाढली.
nसध्या ३ हजार ८७४ पोलीस राज्यातील विविध आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयांतर्गत रुग्णालयात उपचार घेत आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus: 25 policemen died in 16 days in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.