CoronaVaccine: लसीकरणावरून गोंधळ, दुसरा डोस घ्यायचा कुठे?; खासगी हॉस्पिटलमधील लसीकरण बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 06:04 AM2021-05-01T06:04:50+5:302021-05-01T06:05:01+5:30

केंद्र सरकारने शुक्रवारी महाराष्ट्रातील सर्व खासगी लसीकरण केंद्रांना पत्र पाठवले आहे.

CoronaVaccine: Confusion over vaccination, where to take a second dose ?; Vaccination closed in private hospitals | CoronaVaccine: लसीकरणावरून गोंधळ, दुसरा डोस घ्यायचा कुठे?; खासगी हॉस्पिटलमधील लसीकरण बंद

CoronaVaccine: लसीकरणावरून गोंधळ, दुसरा डोस घ्यायचा कुठे?; खासगी हॉस्पिटलमधील लसीकरण बंद

Next

अतुल कुलकर्णी

मुंबई : खासगी हॉस्पिटलमध्ये उद्यापासून लसीकरण बंद ठेवल्यामुळे ज्यांनी पहिला डोस त्या ठिकाणी घेतला आहे, त्यांना दुसरा डोस कुठून घ्यायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने खासगी हॉस्पिटलमधील लसीकरण बंद करायचा निर्णय घेतला आहे. त्यांना लसीकरण करायचे असेल तर लस विकत घ्यावी लागेल. ती केव्हा मिळेल, याविषयी स्पष्टता नाही. त्यामुळे दुसरा डोस कसा आणि कुठून घ्यायचा, असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

केंद्र सरकारने शुक्रवारी महाराष्ट्रातील सर्व खासगी लसीकरण केंद्रांना पत्र पाठवले आहे. तुम्ही ३० तारखेपर्यंत तुमच्याजवळ जेवढा साठा आहे तेवढे लसीकरण करा आणि उर्वरित साठा तुम्हाला ज्यांनी दिला होता त्यांच्याकडे परत करा, असे त्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे ज्यांनी पहिला डोस खासगी हॉस्पिटलमधून घेतला, त्यांना दुसरा डोस खासगी हॉस्पिटलमधूनच मिळेल की नाही, याविषयी त्या पत्रात कोणतीही स्पष्टता नाही. यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘‘ज्या लोकांनी खासगी  हॉस्पिटलमधून पहिला डोस घेतला आहे, त्यांचा दुसरा डोस पूर्ण करावाच लागेल. त्यासाठी खासगी हॉस्पिटलना लस द्यावी लागेल, अन्यथा त्यांच्याकडचे रेकॉर्ड घेऊन ते सरकारी हॉस्पिटलला द्यावे लागेल आणि त्या लोकांना लस देण्याची सोय तेथे करावी लागेल; मात्र याचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे.’’

सिरम आणि भारत बायोटेक यांच्याकडे एकाच वेळी सगळ्यांनी लसीची मागणी सुरू केली तर कोणत्या राज्याला किती लस द्यायची, यावरूनदेखील वाद निर्माण होतील. त्यातसुद्धा केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागेल. या दोन कंपन्यांनी कोणाला किती लस द्यावी? याचे निकषदेखील केंद्राला ठरवावे लागतील. पैसे सगळे देणार आहेत; मात्र वाटपाचे निकष ठरवून द्यावे लागतील. जे अद्याप ठरलेले नाहीत, असे टोपे यांचे म्हणणे आहे.

लसीच्या वाटपाविषयी टोपे म्हणाले, ‘‘सिरम आणि भारत बायोटेकमध्ये तयार होणाऱ्या एकूण लसींच्या ५० टक्के लसी केंद्र सरकार विकत घेणार आहे. उर्वरित ५० टक्के लसी खासगी हॉस्पिटल्स, विविध राज्ये यांना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे खासगी हॉस्पिटल्सना आता लस घ्यायची असेल तर ती त्या ५० टक्केमधून घ्यावी लागेल. राज्यांनाच जेथे लस विकत घेऊन देण्यासाठी प्रचंड कष्ट सहन करावे लागणार आहेत, तेथे खासगी हॉस्पिटलला आणि खासगी कंपन्यांना लस कोण देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 

Web Title: CoronaVaccine: Confusion over vaccination, where to take a second dose ?; Vaccination closed in private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.