Corona vaccine : एसटीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्यावी, परिवहन मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 21:12 IST2021-05-07T21:11:53+5:302021-05-07T21:12:43+5:30
Corona vaccination : एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन त्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे

Corona vaccine : एसटीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्यावी, परिवहन मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनादेखील कोविड योद्धे समजून लसीकरणात प्राधान्य द्यावे, अशी विनंती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
परब म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध कामामध्ये एसटी कर्मचारी आत्तापर्यंत अग्रेसर राहिले आहेत.एसटी कर्मचाऱ्यांना अनेकदा आपल्या कुटुंबापासून लांब जावे लागते, रहावे लागते. प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांशी त्यांचा संपर्क येतो. तसेच शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करोनाच चाचणी करणे आवश्यक केले आहे. या सगळ्याचा विचार करता, संबंधित एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन त्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.
एसटी महामंडळात सध्या सुमारे ९८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, बँक कर्मचारी अशा अनेक अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवासी सेवा देण्याचे काम एसटीचे कर्मचारी अव्याहतपणे करीत आहे. याबरोबरच गेली दीड वर्ष शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार लाखो परप्रांतीयांना राज्याच्या सीमेपर्यंत सुरक्षित नेऊन सोडणे, हजारो विद्यार्थ्यांना परराज्यातून महाराष्ट्रात त्यांच्या घरी सुखरूप आणून सोडणे, हजारो ऊस तोडणी कामगारांना कारखान्यापासून त्यांच्या घरी पोचवणे, तसेच अत्यावश्यक सेवेतील अन्नधान्य, शेतीमाल व इतर मालवाहतूकी मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणे, वैद्यकीय ऑक्सिजन टँकरसाठी, तसेच शासकीय रुग्णावाहिकेसाठी चालक पुरवणे असे कामे एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहेत.