Corona Vaccine: Mumbai will get stocks of 2 lakh 20 thousand vaccines, second dose will be preferred | Corona Vaccine : मुंबईला मिळणार २ लाख २० हजार लसींचा साठा, दुसऱ्या डोसला प्राधान्य

Corona Vaccine : मुंबईला मिळणार २ लाख २० हजार लसींचा साठा, दुसऱ्या डोसला प्राधान्य

मुंबई - कोविड - १९ ला प्रतिबंध करणाऱ्या लसींचा साठा संपत आल्यामुळे मुंबईत शुक्रवारी तणावाचे वातावरण होते. मात्र लवकरच दोन लाख २० हजार लसींचा साठा मिळणार आहे. त्यामुळे शनिवार, रविवार लॉकडाऊनच्या दिवशीही लसीकरण सुरू राहील. परंतु, लसींच्या तुटवड्याचा प्रश्न सुटेपर्यंत ज्यांची नोंदणी होऊन लसीकरणाचा संदेश आला आहे, त्यांनाच डोस मिळणार आहे. यामध्येही दुसऱ्या वेळेचा डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. 

मुंबईत सध्या आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक, सह्व्याधी असलेले व ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. मात्र लसींचा साठा कमी असल्याचा फटका शुक्रवारी मुंबईतील अनेक केंद्रांना बसला. लसीकरण मोहीम थंडविण्याची चिन्हे असताना आता कोविशील्डचे एक लाख ८० हजार आणि कोवॅक्सीनचे ४६ हजार ६३० डोस मुंबईला मिळणार आहेत. मात्र लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात केंद्रांबाहेर गर्दी करीत असल्याने ताण वाढतो. त्यामुळे कोविडचा डोस घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. 

दुसऱ्या डोसला प्राधान्य.... 

मुंबईत शुक्रवार सकाळपर्यंत ८६ हजार लसींचा साठा होता. त्यामुळे १२० लसीकरण केंद्रांपैकी ७१ केंद्रांवर लस देणे शुक्रवारी शक्य झाले नाही. त्यामुळे ४९ केंद्रांवरच लसीकरण सुरू होऊन यापैकी आणखी १९ केंद्रावरील लस दुपारनंतर संपल्या. दरम्यान, दोन लाख २० हजार लसींचा नवीन साठा येणार असला तरी नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर जाऊ नये, असे आवाहन महापौरांनी केले आहे. ज्यांना लसीकरणाचा संदेश आला असेल त्यांनीच केंद्रावर जावे, असा सल्लाही महापौरांनी दिला आहे. त्याचबरोबर आता दुसरा डोस प्राधान्याने देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शनिवार,रविवार पूर्णतः लॉकडाऊन असला तरी लसीकरणाचा संदेश दाखवून प्रवास करता येईल, त्यासाठी पोलिसही सहकार्य करतील.   

लस द्या मगच महोत्सव... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिलदरम्यान लस महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र अपेक्षा आणि गरजेप्रमाण लस उपलब्ध झाल्यास निश्‍चितच लस महोत्सव साजरा करू, असा टोला महापौरांनी लगावला. 

मुंबईकरांनो सहकार्य करावे

शुक्रवार रात्री ८ पासून सोमवार सकाळी ७ पर्यंत लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे. अत्यावश्‍यक सेवा, तातडीची कामे वगळता घराबाहेर पडू नये, असे आवाहनही महापौरांनी केले.
 

English summary :
Corona Vaccine: Mumbai will get stocks of 2 lakh 20 thousand vaccines, second dose will be preferred

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Vaccine: Mumbai will get stocks of 2 lakh 20 thousand vaccines, second dose will be preferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.