राज्यातील कोरोना उपचारांचे क्लेम ९०० कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 18:34 IST2020-09-04T18:34:28+5:302020-09-04T18:34:47+5:30

विमा कंपन्यांकडे ७० हजार रुग्णांचे अर्ज  

Corona treatment claims in the state at Rs 900 crore | राज्यातील कोरोना उपचारांचे क्लेम ९०० कोटींवर

राज्यातील कोरोना उपचारांचे क्लेम ९०० कोटींवर

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना त्यांच्या उपचार खर्चापोटी विमा कंपन्यांकडे सादर केल्या जाणा-या क्लेमच्या संख्येतही लक्षणीयरित्या वाढ होत आहे. ३१ आँगस्टपर्यंत राज्यातील सुमारे ७० हजार रुग्णांना आपल्या उपचार खर्चांच्या परताव्यासाठी विमा कंपन्यांकडे अर्ज केले होते. ती रक्कम ९०० कोटी रुपये होती.

जनरल इन्शुरन्स कौन्सिलकडील आकडेवारीनुसार देशभरातून ३१ आँगस्टपर्यंत १ लाख ७९ हजार कोरोना रुग्णांचे तब्बल २ हजार ७०० रुपयांचे क्लेम विमा कंपन्यांकडे दाखल झाले होते. त्यापैकी १ लाख १० हजार रुग्णांचे जवळपास १ हजार कोटी रुपयांची प्रतिपूर्ति विमा कंपन्यांनी केली आहे. उर्वरित क्लेम मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रातूनच जास्त क्लेम दाखल होत आहेत. त्यापैकी ७५ टक्के क्लेम हे मुंबई (२१, ५००), पुणे (१५,८००) आणि ठाणे (८,५००) या तीन शहरांतील आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो.  शहरी भागांतील रुग्णांचे सरासरी दीड लाख तर ग्रामिण भागातील रुग्णांचे ७५ ते ९० हजार रुपयांपर्यंत क्लेमचा परतावा मिळत असल्याची माहिती विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून हाती आली आहे.   

१५ लाख लोकांनी काढली कोरोना पाँलिसी

कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांवर उपचार खर्चाचा भार पडू नये यासाठी इन्शुरन्स रेग्युलेटरी अथाँरीटी आँफ इंडियाच्या (आयआरडीएआय) सूचनेनुसार विमा कंपन्यांनी कोरोना कवच आणि कोरोना रक्षक या दोन विशेष विमा पाँलिसी बाजारात आणल्या. गेल्या दीड महिन्यांत जवळपास १५ लाख लोकांनी या पाँलिसी घेतल्या आहेत. साडे तीन , साडे सहा आणि साडे नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या या पाँलिसींमध्ये २५० ते ३ हजार रुपयांपर्यंतचा प्रिमियम भरून ५० हजार ते पाच लाखांपर्यंतचे विमा कव्हर मिळवता येते. 

 

Web Title: Corona treatment claims in the state at Rs 900 crore