कोरोना : मुंबई पोर्ट ट्र्स्टला फटका, वाहन निर्यात रोडावली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 06:08 PM2020-07-22T18:08:29+5:302020-07-22T18:08:59+5:30

गतवर्षीच्या 51 हजार 839  निर्यातीच्या तुलनेत लॉकडाऊन कालावधीत अवघ्या 14 हजार 301 वाहनांची निर्यात

Corona hits Mumbai Port Trust, vehicle exports hit | कोरोना : मुंबई पोर्ट ट्र्स्टला फटका, वाहन निर्यात रोडावली

कोरोना : मुंबई पोर्ट ट्र्स्टला फटका, वाहन निर्यात रोडावली

Next

खलील गिरकर

मुंबई : कोरोना मुळे लागू झालेल्या लॉकडाऊनचा फटका  मुंबई पोर्ट ट्र्स्टला मोठ्या प्रमाणात बसला आहे. जागतिक पातळीवर कोरोनाचा प्रसार झालेला असल्याने अनेक देशांमध्ये दुसऱ्या देशातील वस्तुंच्या आयात,  निर्यातीवर  त्याचा परिणाम झाला. मुंबई बंदरातून वाहनांची विविध देशांमध्ये निर्यात केली जाते, मात्र यंदा कोरोनामुळे त्याला मोठा फटका बसला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत 14 हजार 301 वाहनांची निर्यात झाली. तर, गतवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत हे प्रमाण 51 हजार 839 वाहनांची निर्यात करण्यात आली होती.  मुंबई बंदरातून होणाऱ्या एकूण निर्यातीमध्ये वाहन निर्यातीचे प्रमाण मोठे आहे. मात्र यंदा हे प्रमाण कमालीचे खालावले आहे. 

जागतिक पातळीवर व भारतात कोरोनाचा प्रभाव कमी होऊन लॉकडाऊन व मंदीचे वातावरण कमी झाल्याशिवाय ही परिस्थिती पूर्वपदावर येणार नाही असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.  लॉकडाऊन कालावधीत 23 मार्च ते 9 जुलै पर्यंत मुंबई पोर्ट ट्रस्ट तर्फे 429 मालवाहू जहाजांची हाताळणी करण्यात आली. गतवर्षी 23 मार्च ते 9 जुलै या कालावधीत 623 मालवाहू जहाजांची हाताळणी करण्यात अाली होती. ड्राय बल्क मध्ये 3032 हजार टन हाताळण्यात आले. गतवर्षी हे प्रमाण 5051 हजार टन होते. ब्रेक बल्क मध्ये 799 हजार टन हाताळणी करण्यात आली गतवर्षी हे प्रमाण 1641 हजार टन होते. लिक्विड बल्क मध्ये 9470 हजार टन हाताळणी करण्यात आली तर गतवर्षी हे प्रमाण 11139 हजार टन हाताळणी करण्यात आली होती.  कंटेनर मालवाहतुकीमध्ये 22 हजार टन माल हाताळण्यात आला तर गतवर्षी हे प्रमाण 
91 हजार टन इतके होते. लॉकडाऊन मुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने त्याचा परिणाम आयात व निर्यातीवर झाला आहे. 

मुंबई पोर्ट ट्र्स्टचे अध्यक्ष संजय भाटिया म्हणाले,  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बंदराद्वारे होणाऱ्या व्यापारावर काहीसा परिणाम झाला आहे मात्र आम्ही उपलब्ध कर्मचारी वर्ग व संसाधनांच्या माध्यमातून शक्य तितके चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे.  ही परिस्थिती हळूहळू पूर्व पदावर येईल असा विश्वास भाटिया यांनी व्यक्त केला.

Web Title: Corona hits Mumbai Port Trust, vehicle exports hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.