'संशोधन, पुस्तकासाठी नक्षलवाद्यांशी संपर्कात होतो'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 06:00 IST2019-04-16T05:59:52+5:302019-04-16T06:00:18+5:30
संशोधनाकरिता आणि पुस्तकासाठी नक्षलवाद्यांच्या संपर्कात होतो

'संशोधन, पुस्तकासाठी नक्षलवाद्यांशी संपर्कात होतो'
मुंबई : संशोधनाकरिता आणि पुस्तकासाठी नक्षलवाद्यांच्या संपर्कात होतो. त्यामुळे आपल्यावर बेकायदेशीर (हालचाली) प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा कसा नोंदविला जाऊ शकतो, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी सोमवारी उच्च न्यायालयात उपस्थित केला.
३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाड्यात झालेल्या एल्गार परिषदेमुळे कोरेगाव भीमा येथे दुसऱ्या दिवशी हिंसाचार घडला. या प्रकरणी गौतम नवलखा व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांनी गुन्हा नोंदविला. त्यांच्यावर माओवाद्यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आला.
नवलखा हे लेखक असून शांततेचे पुरस्कर्ते आहेत. तसेच सरकार व नक्षलवाद्यांमध्ये मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नक्षलवाद्यांनी सहा पोलिसांचे अपहरण केल्यानंतर सरकारने त्यांची ‘मध्यस्थी’ म्हणून नियुक्ती केली होती. त्यांचा नक्षलवाद्यांशी संपर्क आहे, तो केवळ त्यांच्या पुस्तकासाठी आणि संशोधनाकरिता. त्यामुळे त्यांच्यावर बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा कसा नोंदविला जाऊ शकतो,’ असा सवाल नवलखा यांचे वकील युग चौधरी यांनी न्यायालयात केला. नवलखा यांनी त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे.
>न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी ठेवत नवलखा यांना दिलेला अंतरिम दिलासा कायम केला. न्यायालयाने त्यांना २६ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले. नवलखा यांच्यासह वरावरा राव, अरुण फेरेरा, वर्नोन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज यांनाही कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.