गडकरींचं नाव टाळण्याचं कारस्थान, फडणवीसांचा सहभाग; राऊतांनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 03:09 PM2024-03-08T15:09:26+5:302024-03-08T15:32:42+5:30

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करत मेळावे, बैठका, सभा घेत आहेत.

Conspiracy to avoid Nitin Gadkari's name in first list of bjp candidates, involvement of Devendra Fadnavis; Raut said 'political reason' | गडकरींचं नाव टाळण्याचं कारस्थान, फडणवीसांचा सहभाग; राऊतांनी सांगितलं राज'कारण'

गडकरींचं नाव टाळण्याचं कारस्थान, फडणवीसांचा सहभाग; राऊतांनी सांगितलं राज'कारण'

मुंबई - आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी भाजपाने १९५ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, सरकारमधील विद्यमान ३४ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट देण्यात आलं आहे. मात्र, केंद्र सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर असलेल्या आणि भाजपातील बड्या नेत्यांपैकी एक असलेल्या नितीन गडकरी यांचे नाव पहिल्या यादीत नाही. त्यावरुन, विरोधकांनी विशेषत: शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. केंद्रातील मोदी आणि शाह यांनी जाणीवपूर्वक निष्ठावंत गडकरींना वेटींगवर ठेवल्याचं म्हटलं आहे. आता, गडकरींचा अपमान करण्यासाठी हे कारस्थान रचण्यात आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करत मेळावे, बैठका, सभा घेत आहेत. धाराशिवमधील एका सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येण्याची खुली ऑफर दिली होती. काळी संपत्ती गोळा करणार्‍या कृपाशंकरसिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र, भाजपा वाढविण्यात ज्यांची हयात गेली, त्या नितीन गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. नितीन गडकरीजी भाजपाचा राजीनामा द्या. महाविकास आघाडीमध्ये या. आम्ही महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी थेट शब्दांत भाष्य केले आहे. आता, नितीन गडकरींना पहिल्या यादीत स्थान न देण्यामागे कारस्थान रचण्यात आले असून त्यात देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सत्य असे आहे की, म्हणत राऊत यांनी ट्विटरवरुन पोस्ट शेअर केली आहे.  

सत्य असे आहे की...

देवेंद्र फडणवीस हे मोदी शहा यांच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्राचे, नागपूरचे आणि संघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांचा समावेश असलेल्या भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचे नाव असायलाच हवे असा आग्रह ते करु शकले असते. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्यामुळे महाराष्ट्राची यादी प्रलंबित आहे हा केवळ बहाणा आहे. गडकरींच्या नागपूर मतदारसंघाचा महायुतीच्या जागावाटपाशी कवडीचाही संबंध नाही. गडकरींना अपमानित करण्याच्या उद्देशानेच त्यांच्या उमेदवारीची घोषणा टाळण्यात आली असून या कारस्थानात केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून फडणवीसही आनंदाने सामील झाले आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत

मला वाटते की, स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींसारख्या नेत्यांना ही ऑफर देणे म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने मी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती करतो, असे सांगण्यासारखे आहे. नितीन गडकरी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पहिली यादी आली त्यात महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याचे नाव नव्हते. महाराष्ट्राचा निर्णय झाला नव्हता, त्यामुळे आम्ही ती चर्चा केली नाही. महायुतीचा निर्णय होऊन महाराष्ट्रातल्या जागांवर जेव्हा चर्चा होईल, त्यावेळी सर्वात आधी नितीन गडकरींचे नाव येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना व्यक्त केला. 
 

Web Title: Conspiracy to avoid Nitin Gadkari's name in first list of bjp candidates, involvement of Devendra Fadnavis; Raut said 'political reason'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.