‘वंचित’बरोबर आघाडीसाठी काँग्रेसचे सूत जुळेना? सपकाळ म्हणतात... असे घडत नाही, याचे दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:04 IST2025-12-26T09:03:50+5:302025-12-26T09:04:08+5:30
वंचित, काँग्रेस एकत्र आले पाहिजेत, ही जनभावना आहे. याचा आदर झाला पाहिजे, असे वाटणारा मी कार्यकर्ता आहे. या गोष्टी घडून येत नाहीत, हे दुःखद आहे, असे सपकाळ म्हणाले.

‘वंचित’बरोबर आघाडीसाठी काँग्रेसचे सूत जुळेना? सपकाळ म्हणतात... असे घडत नाही, याचे दु:ख
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू असले तरी, असे होत नसल्याचे दु:ख असल्याची पोस्ट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. त्यामुळे काँग्रेस-वंचित आघाडी होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वंचित, काँग्रेस एकत्र आले पाहिजेत, ही जनभावना आहे. याचा आदर झाला पाहिजे, असे वाटणारा मी कार्यकर्ता आहे. या गोष्टी घडून येत नाहीत, हे दुःखद आहे, असे सपकाळ म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या बैठकीत नेमके कोणते नेते होते?
सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक गुरुवारी टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला विजय वडेट्टीवार, सतेज ऊर्फ बंटी पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, अमिन पटेल, रणजित कांबळे, सुनील देशमुख, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, मोहन जोशी उपस्थित होते.
पुण्यातही अजित पवार यांच्यासोबत जाणार नाही
पुणे : महापालिका निवडणुकीत भाजपला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसोबत काँग्रेसही एकत्र येईल अशी चर्चा असतानाच काँग्रेसने मात्र स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी भाजपला रोखण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
त्याचा परिणाम मतांच्या फुटीवर होणार असून अप्रत्यक्षरीत्या भाजपलाच फायदा होईल, असे बोलले जात आहे. मात्र, स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसला १६५ उमेदवार मिळणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, उद्धवसेनेसोबत मनसे आल्यास त्यालाही विरोध असल्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस युतीसंदर्भात खरेच गंभीर आहे का : वंचितचा सवाल
जागावाटपासाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील चर्चेच्या पहिल्या फेरीत काही ठोस निष्पन्न झाले नसताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोलणी करण्यास काँग्रेसच्या दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेत्यांना पाठवले जात असल्यामुळे काँग्रेस युती करण्यासंदर्भात खरोखरच गंभीर आहे का, असा सूर वंचितच्या गोटातून व्यक्त होत आहे. आंबेडकर राष्ट्रीय नेते असून बोलणी करायला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष किंवा किमान मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी पुढाकार घेणे अपेक्षित होते, पण तसे होत नसल्याने काँग्रेस जागावाटपाचा ‘खेळ’ खेळत आहे का, असाही सवाल केला जात आहे.