माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:42 IST2025-12-18T12:41:22+5:302025-12-18T12:42:51+5:30
Pradnya Satav BJP: काँग्रेसचे माजी खासदार स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी तथा माजी आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या. सातव यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तंब झाले. काँग्रेसचे नेते स्व. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सातव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये येण्यामागची भूमिकाही मांडली.
काँग्रेस सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा देत प्रज्ञा सातव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश का केला?
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रज्ञा सातव म्हणाल्या, "विकास कामांसाठी, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि राजीव सातव यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाच्या परिवारात आलो आहोत. मी आताच जाऊन विधानभवनात राजीनामा दिला आहे. इथे येऊन भाजपची कार्यकर्ता म्हणून काम आजपासून सुरू करत आहे", असे प्रज्ञा सातव म्हणाल्या.
'मी अजून खूप लहान आहे'
काँग्रेसचं काय चुकतंय असा प्रश्न प्रज्ञा सातव यांना विचारण्यात आला. त्या म्हणाल्या, "काँग्रेसचं काय चुकतंय, हे बोलण्यासाठी मी खूप लहान आहे. त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू शकणार नाही."
"मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात विकासाचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकास होत आहे. आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आम्हालाही यात सामील व्हायचं आहे. कार्यकर्त्यांमुळेच मी आज या पक्षात प्रवेश केला आहे", असे प्रज्ञा सातव यांनी सांगितले.
"आमचे अधिवेशन झाले. त्यानंतर माझी कार्यकर्त्यांशी चर्चा झाली. खूप घाईमध्ये हे सगळे झाले. त्यामुळे मला कुणाशी बोलायला वेळ मिळाला नाही", असेही प्रज्ञा सातव या म्हणाल्या.
राजीव सातव यांच्या निधनानंतर बनल्या आमदार
डॉ. प्रज्ञा सातव या गेल्या काही वर्षात सक्रिय राजकारणात आल्या. राजीव सातव यांचे आजारामुळे निधन झाल्यानंतर प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने विधान परिषदेवर पाठवले. २०२४ मध्ये दुसऱ्यांदा त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले.
२०३० पर्यंत त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ होता. पण, पाच वर्ष शिल्लक असतानाच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सातव यांच्या भाजपमध्ये जाण्याला काँग्रेसमधील अंतर्गत कलहाची किनार असल्याचीही चर्चा आहे. त्याचबरोबर पक्षात त्यांना बाजूला ठेवलं जात असल्यामुळे त्या नाराज असल्याचेही बोलले जात होते.