Join us

राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत यासाठी आम्ही मेहनत घेतोय - मल्लिकार्जुन खर्गे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 08:49 IST

काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून आमच्या जागा जास्त येऊन राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही आमची इच्छा आहे - मल्लिकार्जुन खर्गे

मुंबई - निवडणुकीनंतर ज्यांच्या जागा अधिक, त्यांचा पंतप्रधान होईल, असे विधान शरद पवार यांनी केले असले तरी हा त्यांचा विचार आहे. काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून आमच्या जागा जास्त येऊन राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही मेहनत घेतोय, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले आहे. मंगळवारी पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे. शिवाय, आगामी निवडणूक ही विचारधारेची लढाई आहे. नरेंद्र मोदी संघाची विचारधारा राबवित असून ही विचारधारा देशासाठी घातक आहे, असंही ते यावेळी म्हणालेत.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मंगळवारी दादर येथील टिळक भवनात प्रदेश पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळेस मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, येत्या काळात सर्वच नेत्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवत निवडणुका लढवायला हव्यात, समविचारी पक्षांनी एकत्र निवडणुका लढविताना वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कर्नाटकमध्ये भाजपाला दूर ठेवण्यासाठी छोट्या पक्षाला संधी दिली. विचारधारेच्या लढाईसाठी काँग्रेसने हा त्याग केला आहे. असा त्याग करण्याची तयारी सर्वांनी ठेवायला हवी.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्व काँग्रेस नेते, प्रदेश पदाधिकारी आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीकडून फॉर्म्युला नाहीराष्ट्रवादीकडून आघाडीबाबत ५०-५० टक्केचा फॉर्म्युला दिल्याची दिवसभर चर्चा होती. मात्र असा प्रस्ताव आला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वत: आपल्याला फोन करून याबाबतच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :राहुल गांधीकाँग्रेसनरेंद्र मोदी