“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 19:46 IST2025-07-03T19:45:30+5:302025-07-03T19:46:59+5:30

Congress Vijay Wadettiwar News: शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या. सोयाबीन आणि धानाला भाव द्या, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

congress vijay wadettiwar demands that farmers should be given a complete loan waiver and no committee is needed for that | “शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी

“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी

Congress Vijay Wadettiwar News:विधानसभा  निवडणुकी आधी शेतकऱ्यांना आश्वासन द्यायची आणि सत्ता आल्यावर मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. बळीराजाच्या विविध प्रश्नावर २९३ च्या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. 

राज्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना निवडणुकी आधी कोरडवाहू पिकांसाठी १३ हजार ५००, बागायतीसाठी २७ हजार तर फळबागांसाठी ३६ हजार रुपये इतकी मदत आणि ३ हेक्टरपर्यंतची मर्यादा निश्चित होती. पण आता सत्ता आल्यावर मात्र निवडणुकीनंतर कोरडवाहूसाठी ८ हजार ५००, बागायतीसाठी १७ हजार आणि फळबागांसाठी २२ हजार इतकी घटवण्यात आली. इतकेच नाहीतर ३ हेक्टची मर्यादा २ हेक्टर करण्यात आली.  निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे महायुतीने आश्वासन दिले होते आता मात्र कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची भाषा वापरली जाते. शेतकऱ्यांना समिती नको तर कर्जमाफी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. 

राज्याचे कृषिमंत्री सतत शेतकऱ्यांचा अपमान करणारी विधाने करतात

शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भाव देऊ, असे सांगितले जात होते. परंतु, आता सोयाबीन आणि धानाला हमीभाव मिळत नाही. राज्याचे कृषिमंत्री हे पदावर बसून सतत शेतकऱ्यांचा अपमान करणारी विधाने करतात. कृषी खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे, असे त्यांना वाटते. यावरून ते किती असंवेदनशील आहेत, हे स्पष्ट होते. शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या या कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांना हवे ते मलईदार खाते द्यावे पण शेतकऱ्यांच्या अपमान करणारे कृषिमंत्री नको, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.

सत्ताधारी मंत्री, आमदार सगळेच बळीराजाचा अपमान करतात

सत्ताधारी मंत्री ,आमदार सगळेच बळीराजाचा अपमान करत आहे. आम्ही शेतकऱ्यांना पैसे दिले, मोदींनी सहा हजार रुपये दिली, ही उपकाराची भाषा बोलली जाते. एकीकडे सहा हजार रुपये दिले पण खताचे भाव किती वाढले, युरियाचे भाव काय आहेत? रासायनिक खतांची किंमत वाढली, पिकासाठी औषधांची किंमत वाढली म्हणजे एका खिशात टाकले आणि दुसऱ्या खिशाला कात्री लावली. त्यात शेतमालाला भाव मिळत नाही मग शेतकऱ्यांना पैसे दिले ही कसली भाषा आहे? असा सवाल विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.

विरोधक हा शेतकऱ्यांचा आवाज आहेत

राज्यात विविध प्रकल्पांसाठी सरकार निधी देते, उद्योगपतींचे कर्ज सरकार माफ करते पण शेतकऱ्यांना मदत करताना मात्र सरकारच्या हाताला लकवा मारतो का? अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. शक्तिपीठ महामार्गाला विरोधक विरोध करतात, असा आरोप करतात पण शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्ग नको, त्यांची सुपीक जमीन या महामार्गात जाणार आहे. विरोधक हा शेतकऱ्यांचा आवाज आहे त्यामुळे आम्ही विरोध करत आहोत अस वडेट्टीवर यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, सोयाबीन, कापसाला भाव मिळाला नाही. पीक लावताना जो खर्च झाला तो शेतकऱ्यांचा निघत नाही. धानाचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही आम्ही सरकारला ओरडून सांगत आहोत पण सरकार मान्य करायला तयार नाही. पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतकरी पैसे भरतात पण त्यांना विमा मिळत नाही. पीकविमाच्या नावाखाली कोणी पैसे उचलले? शेतजमीन दाखवून कोणत्या अधिकाऱ्यांनी पैसे लाटले याची चौकशी व्हायला हवी, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

 

Web Title: congress vijay wadettiwar demands that farmers should be given a complete loan waiver and no committee is needed for that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.