“या एतिहासिक दिवशी मिलिंद देवरांकडून अशी घोषणा होणे खूप वेदनादायी”: वर्षा गायकवाड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 02:07 PM2024-01-14T14:07:34+5:302024-01-14T14:08:19+5:30

Milind Deora Left Congress Party: हे पाऊल उचलू नये यासाठी आम्ही सर्वजण तुमची समजूत काढायचा प्रयत्न करत होतो. पक्ष नेतृत्वाने बातचीत केली होती, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

congress varsha gaikwad reaction over milind deora decision of left the party | “या एतिहासिक दिवशी मिलिंद देवरांकडून अशी घोषणा होणे खूप वेदनादायी”: वर्षा गायकवाड

“या एतिहासिक दिवशी मिलिंद देवरांकडून अशी घोषणा होणे खूप वेदनादायी”: वर्षा गायकवाड

Milind Deora Left Congress Party: गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. यावरून काँग्रेस नेत्यांनी मिलिंद देवरा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. एकीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होत असून, दुसरीकडे मिलिंद देवरा यांनी दिलेल्या राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत, या एतिहासिक दिवशी तुमची ही घोषणा होणे खूप वेदनादायी आहे, असे म्हटले आहे.

मी माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या प्रकरणाचा शेवट करत आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. काँग्रेसशी माझ्या कुटुंबाचे ५५ वर्षांपासूनचे संबंध आहेत जे मी आज संपवत आहे. इतकी वर्षे मला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसमधील नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे, अशी पोस्ट एक्सवर शेअर करत मिलिंद देवरा यांनी आपला निर्णय जाहीर केला. यानंतर देशभरातील काँग्रेस नेत्यांनी यावर भाष्य करताना या निर्णयावर टीका केली. 

मला वैयक्तिकरित्या हा निर्णय पटला नाही

तुम्ही हा निर्णय घेतला हे दुर्दैव आहे. मला वैयक्तिकरित्या हा निर्णय पटला नाही. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मला आज खूप वाईट वाटत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देवरा कुटुंबाचे काँग्रेस परिवाराशी संबंध आहेत. तुम्ही हे पाऊल उचलू नये यासाठी आम्ही सर्वजण तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होतो. पक्ष नेतृत्वानेही तुमच्याशी बातचीत केली होती. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा पहिला दिवस आहे. या एतिहासिक दिवशी तुमची ही घोषणा होणे खूप वेदनादायी आहे, असे वर्षा गायकवाड यांनी आपल्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, मी विकासाच्या मार्गावर जात आहे, अशी एका वाक्यात प्रतिक्रिया मिलिंद देवरा यांनी दिली. राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळेस शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर उपस्थित होते. दर्शन घेतल्यानंतर माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मिलिंद देवरा यांनी यावर अधिक काहीच भाष्य केले नाही. 
 

Web Title: congress varsha gaikwad reaction over milind deora decision of left the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.