मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 07:21 IST2025-12-29T07:20:31+5:302025-12-29T07:21:37+5:30
काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी या आघाडीची घोषणा केली.

मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या युतीची रविवारी घोषणा झाली. मुंबईत २२७ जागांपैकी वंचित ६२ जागा लढणार आहे. तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला १० च्या आसपास जागा सोडून काँग्रेस १५० च्या आसपास जागा लढवणार आहे. राज्यातील इतर २८ महापालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाणार असून तसे अधिकार दोन्ही पक्षाने स्थानिक पातळीवर दिले आहेत. काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी या आघाडीची घोषणा केली.
यावेळी काँग्रेसचे नेते सचिन सावंत, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, वंचितचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, मुंबई महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल सोहनी, मुंबई युवा आघाडी अध्यक्ष सागर गवई उपस्थित होते. यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की, दोन्ही पक्षांची वैचारिक भूमिका एकच आहे. दोन्ही पक्ष संविधानवादी आहेत, संविधानाला अभिप्रेत भारत घडवणे हा दोघांचा विचार आहे. १९९८ व १९९९ च्या निवडणुकीत दोन्ही पक्षात आघाडी झाली होती, आता २५ वर्षांनी दोन पक्ष एकत्र आले आहेत.
राज्यात युती, आघाडीचे काय चित्र ?
महापालिका निवडणुकीत कोणाशी कुणी युती करावी आणि कोणाशी आघाडी करावी याचे गणित अद्यापही जुळताना दिसत नाही. अनेक महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, तर काही ठिकाणी शिंदेसेना आणि अजित पवार गट मिळून भाजपच्या विरोधात लढत आहेत. मुंबईत उद्धवसेना-मनसे एकत्र तर भाजप-शिंदेसेना एकत्र असताना अजित पवार गट स्वतंत्र लढत आहे.
सोलापूर : भाजप v/s शिंदे, अजित पवार
भाजपविरोधात युती करण्याचा निर्णय शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) च्या नेत्यांनी रविवारी जाहीर केला. त्यांनी १०२ पैकी ५१-५१ जागा लढविण्याचा निर्णय घेतला.
अकोला : काँग्रेस-शरद पवार गटाचे ठरले काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यातील आघाडी जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
अमरावती : काँग्रेस-उद्धवसेना एकत्र -
काँग्रेस, उद्धवसेना यांच्यात आघाडी करून एकत्रितपणे निवडणूक लढण्याचे उद्देशाने शनिवारी चर्चा झाली आहे.
चंद्रपूर : वंचित-उद्धवसेनेची युती
वंचित बहुजन आघाडी आणि उद्धवसेना प्रत्येकी ३३-३३ जागांवर निवडणूक लढविणार आहेत.
जळगाव : महायुतीत 'बिनसलं'
मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मात्र, १५ मिनिटातच पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बैठकीतून बाहेर पडले.
नाशिक : राष्ट्रवादी-शिंदेसेना एकत्र
भाजपकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शिंदेसेना भाजपकडून व राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र आले.
छ. संभाजीनगर: भाजप-शिंदेसेनेत त्रांगडे
महापालिका निवडणुकीत युती करण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेच्या कालपर्यंत नऊ बैठका झाल्या. परंतु अद्यापही १२ जागांवर एकमत होऊ शकले नाही.
फडणवीसांची नागपुरात गडकरींशी चर्चा, मुंबईतील बैठक बारगळली
भाजप - शिंदेसेनेच्या मुंबईतील जागांसंदर्भात दोन्हीकडच्या नेत्यांची सातत्याने बैठक होऊनही ज्या जागा अनिर्णित राहिल्या त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी रात्री बैठक होण्याची अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री हे नागपुरातील जागावाटपासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यासाठी उशिरापर्यंत तेथेच थांबले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास ते मुंबईला पोहोचले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत त्याबाबत बैठक होऊ शकली नव्हती.