पालघरमध्ये साधूंच्या हत्येनंतर धर्माच्या नावाने राजकारण; जुन्या अन् नव्या प्रकरणांच्या चाैकशीचा काॅंग्रेसचा आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:51 IST2025-10-28T11:51:30+5:302025-10-28T11:51:46+5:30
महायुती सरकारला प्रवक्ते सावंत यांचे अनेक सवाल

पालघरमध्ये साधूंच्या हत्येनंतर धर्माच्या नावाने राजकारण; जुन्या अन् नव्या प्रकरणांच्या चाैकशीचा काॅंग्रेसचा आग्रह
मुंबई : मुंबईतील भाजप मुख्यालयाच्या जागेचा हस्तांतरण व्यवहार, फलटण येथील महिला डॉक्टरची आत्महत्या आणि पुण्यातील जैन हॉस्टेलच्या जमीन प्रकरणासह पालघरमधील साधू हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुती सरकारला अनेक सवाल केले आहेत.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने चौकशी करूनही काहीच निष्पन्न झाले नाही. मात्र, बिहार विधानसभेच्या गेल्या निवडणुकीसाठी या प्रकरणाचा राजकीय वापर केला गेला, अशी टीकाही त्यावेळी त्यांनी केली.
पालघरमध्ये साधूंच्या हत्येनंतर धर्माच्या नावाने राजकारण
पालघरला २०२०मध्ये काही साधूंची जमावाकडून हत्या झाली. त्याचेही धर्माच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, अशी टीका करत महायुती सरकारनेच फेक नरेटिव्ह सेट करत महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप सावंत यांनी केला.
मुंबईतील भाजप मुख्यालयाच्या जागेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ‘शेड्यूल डब्ल्यू’मध्ये असलेली जमीन हस्तांतरीत झाली कशी? याचे उत्तर महापालिका आयुक्तांनी द्यावे, अशी अपेक्षाही सावंत यांनी व्यक्त केली. या जमिनीबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता का? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
भाजपने केंद्रीय यंत्रणांचा ११ वर्षे सत्तेसाठी गैरवापर केला असून, पुण्यातील जैन हॉस्टेल जमीन, फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू आणि भाजप प्रदेश कार्यालय जागा प्रकरणाची केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.