Join us

सत्तेत येऊन राष्ट्रवादी-शिवसेनेनं 'जे' केलं, ते काँग्रेसनेही करावं; मिलिंद देवरांचे सोनिया गांधींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 11:50 IST

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचं सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सत्तेत आलं आहे.

मुंबई - राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार येऊन ५० दिवस उलटल्यानंतरही काँग्रेसच्या आश्वसनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या आश्वसनांची पूर्तता होण्यासाठी समिती गठीत करावी अशी मागणी केली आहे. 

या पत्रात मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे की, सर्वप्रथम आपले आभार मानतो कारण काँग्रेसशासित राज्यांमध्ये पक्षाने लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सरकारला लोकांचा विश्वास आणि पारदर्शक कारभार पुढे नेण्यासाठी मदत होईल. निवडणुकीत पक्षाने दिलेल्या आश्वासनाबाबत भारतीय नागरिक सुज्ञ झाला आहे. अनेकांनी पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे असं त्यांनी सांगितले. 

मात्र गेल्या ५० दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांचे अजेंडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी ते प्रयत्न करतायेत. राज्यातील जनता सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत आहे. याचवेळी मार्च २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी मुंबईत केलेल्या भाषणात गरिबांना ५०० स्क्वेअर फूट घरं देण्याचं आश्वासन दिलं होतं. किमान समान कार्यक्रमात याचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईतील मतदार नेहमी काँग्रेसवर विश्वास ठेऊन असतो. १९८४ पासून काँग्रेसने मुंबईकरांना परवडणारी घरं देण्याचं काम केलं आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने मुंबईकरांना अनेक आश्वासनं दिली होती. त्यामुळे या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही समिती गठीत करावी अशी मागणी पत्राद्वारे सोनिया गांधी यांना करण्यात आली आहे. 

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचं सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सत्तेत आलं आहे. यामध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी एका भाषणात उल्लेख केल्याप्रमाणे सरकार संविधानाच्या चौकटीत काम करेल असं सोनिया गांधी यांनी लिहून घेण्याचं सांगितलं होतं त्याप्रमाणे शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंनी हे मान्य केलं. पण आम्ही काहीही लिहून दिलं नाही असा दावा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केला. तर अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकीची आहे. किमान समान कार्यक्रमाचा आराखडा बनवताना त्यात अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत त्यावर तिन्ही पक्षाने स्वाक्षरी केली आहे फक्त शिवसेनेने केली असं नाही अशी टीका राष्ट्रवादीने केली. त्यामुळे आता मिलिंद देवरा यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी शिवसेना आपले अजेंडा सरकारमध्ये राबवत असेल तर काँग्रेसनेही आपल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी केली आहे.  

टॅग्स :काँग्रेसशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेससोनिया गांधीमहाराष्ट्र सरकार