Join us  

काँग्रेस सावरकरविरोधी नाही, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मोठे विधान  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 3:00 PM

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत मोठे विधान केले आहे.

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन भाजपाने महाराष्ट्र विधामसभा निवडणुकीसाठीच्या संकल्पपत्रामधून दिले आहे. भाजपाने दिेलेल्या या आश्वासनामुळे सध्या मोठा राजकीय वाद पेटला असून, दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. काँग्रेस ही सावरकरविरोधी नाही. वीर सावरकर यांच्याबाबत आम्हाला आदरच आहे.  मात्र त्यांच्या विचारांबाबत मतभेद आहेत, असे मनमोहन सिंह यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा विषय भाजपाने आपल्या संकल्पत्रात समाविष्ट केला होता. त्यावरून सध्या मोठा गदारोळ माजला आहे. त्यावरून विरोधी पक्षांकडून भाजपाला लक्ष्य करण्यात येत आहे. अशा वातावरणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. ''काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यवीर सावरकरविरोधी नाही. सावरकरांबाबत आम्हाला आदरच आहे. स्वत: इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकीटाचे अनावरण केले होते.'' असे मनमोहन सिंह यांनी सांगितले. तसेच भारतरत्न कुणाला द्यावे हे एक समिती ठरवते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, कलम 370 हटवण्यासाठी काँग्रेस पक्षाने सुद्धा पाठिंबा दिला होता. कलम 370 हे अस्थायी आहे असेच आम्ही समजत होतो. हे कलम जम्मू काश्मीरमधील लोकांच्या भल्यासाठी हटवले गेले पाहिजे होते. मात्र हे कलम ज्याप्रकारे हटवले गेले, त्याला आमचा विरोध होता, असेही मनमोहन सिंग यांनी सांगितले.  'महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अन् वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार'

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून जाहीर करण्यात आलेल्या संकल्पपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा उल्लेख करण्यात आला होता.  यामध्ये राज्याची अस्मिता आणि अभिमानास्पद वारसा जोपसण्यासाठी भाजपाने महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिले होत. 

टॅग्स :मनमोहन सिंगविनायक दामोदर सावरकरकाँग्रेसराजकारण