Join us  

Shiv Smarak : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, राज्य सरकारवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 3:51 PM

Shiv Smarak Latest Update : "जलपूजन होऊन अनेक वर्षे उलटली तरी मुंबईतील समुद्रात नियोजित असलेल्या शिवस्मारकाच्या कामाला अद्याप वेग येऊ शकलेला नाही.

मुंबई - जलपूजन होऊन अनेक वर्षे उलटली तरी मुंबईतील समुद्रात नियोजित असलेल्या शिवस्मारकाच्या कामाला अद्याप वेग येऊ शकलेला नाही. दरम्यान, शिवस्मारकावरूनकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी  केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन आज करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव सचिन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ते नवाब मलिक उपस्थित होते. यावेळी शिवस्मारकाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी केला. "शिवछत्रपतीजीका आशीर्वाद चलो चले मोदीजीके साथ'' म्हणून सत्तेवर आलेल्या पक्षाच्या सरकारने इतर सर्व ठिकाणी भ्रष्टाचार तर केलाच, पण शिवस्मारकाच्या कामातही भ्रष्टाचार करण्यास यांनी मागेपुढे पाहिले नाही. शिवस्मारकाच्या कामातही घोटाळा केला.''असा आरोप मलिक यांनी केला. यावेळी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही मलिक यांनी केलेल्या आरोपांचे समर्थन केले.   'राज्यात भ्रष्टाचारमुक्त शासनाचे आश्वासन देऊन हे सरकार सत्तेवर आले होते. मात्र या सरकारच्या काळात चिक्की घोटाळा, भूखंड घोटाळा, असे अनेक घोटाळे झाले. पाच वर्षांत आपल्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नसल्याचा दावा मुख्यमंत्री करतात. मात्र गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांच्या काही मंत्र्यांना मंत्रिपद सोडावे लागले,' असा टोलाही मलिक यांनी यावेळी लगावला.  

टॅग्स :शिवस्मारकमहाराष्ट्र सरकारकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामुंबई