Join us  

काँग्रेस-राष्ट्रवादीचे २२० जागांवर एकमत; अंतिम निर्णय लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 5:36 AM

जयंत पाटील यांची माहिती : राष्ट्रवादी काँग्रेसकडे ८१३ इच्छुकांचे अर्ज

पुणे : ‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटपाची चर्चा अद्याप पूर्ण झालेली नाही. आतापर्यंत २२० जागांवर निर्णय झाला आहे. काही जागांच्या अदलाबदलीबाबत निर्णय व्हायचा आहे. त्यासाठी पुढील दोन-चार दिवसांत आघाडीची बैठक होईल. त्यात जागावाटपाचा अंतिम निर्णय होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

बारामती होस्टेल येथे शुक्रवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक झाली. बैठकीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, फौजिया खान, शशिकांत शिंदे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जयदेव गायकवाड आदी नेते उपस्थित होते. सुमारे दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. राज्यभरातून पक्षाकडे आलेल्या ८१३ अर्जांचा विचार करण्यात आला. काँग्रेस व मित्रपक्षांसोबत झालेल्या चर्चेची माहिती सगळ््यांना देण्यात आली. आलेल्या अर्जांबद्दल सर्वांची मते विचारात घेतली. आघाडीची चर्चा खूप पुढे गेली आहे. काँग्रेसचीही दिल्लीत बैठक झाली आहे. दोन-चार दिवसात आघाडीची आणखी एक बैठक होईल. त्यात सर्व जागांवर निर्णय घेतला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, आमच्याकडे प्रत्येक मतदारसंघात चांगले उमेदवार आहेत. नेते त्यांची खुर्ची वाचविण्यासाठी गेले असतील, पण कार्यकर्ते पक्षासोबत आहेत. ज्या ठिकाणी काही लोकांनी पक्ष सोडला आहे, तिथे पर्यायी नावांचा विचार केला आहे. अतिशय चांगले आणि राष्ट्रवादी काँग्रसचे बळ वाढविणारे नेते असून त्यांचा विचार झाला आहे. जिथे एकच अर्ज आहे, तिथे उमेदवार कामाला लागले आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्ज तसेच आघाडीत जागा सोडण्याबाबत निर्णय नाही, त्यामुळे आम्ही थांबलो आहोत.वंचित आघाडीला मुख्यमंत्र्यांचे पाठबळवंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त मते पडावीत आणि आघाडीच्या मतांची विभागणी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी शक्य असेल त्या-त्या मार्गाने वंचितला ताकद मिळावी, यासाठी ते प्रत्नशील आहेत. त्याचाच तो एक भाग म्हणून त्यांनी वंचितबाबत वक्तव्य केले आहे, असा आरोप करून पाटील यांनी वंचितसोबत काँग्रसची चर्चा सुरू होती. त्यांची काय चर्चा झाली, याची आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसजयंत पाटीलकाँग्रेसवंचित बहुजन आघाडी