“११ वर्ष केंद्रात भाजपाचे सरकार, ‘लाडकी बहीण’चा फायदा घेणारे बांगलादेशी भारतात आले कसे?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:50 IST2025-01-23T18:47:12+5:302025-01-23T18:50:08+5:30

Congress Nana Patole News: बांगलादेशी घुसखोर महिलांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे म्हटले जात आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.

congress nana patole criticized mahayuti govt over mukhyamantri majhi ladki bahin yojana | “११ वर्ष केंद्रात भाजपाचे सरकार, ‘लाडकी बहीण’चा फायदा घेणारे बांगलादेशी भारतात आले कसे?”

“११ वर्ष केंद्रात भाजपाचे सरकार, ‘लाडकी बहीण’चा फायदा घेणारे बांगलादेशी भारतात आले कसे?”

Congress Nana Patole News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरली. लोकसभेच्या धक्कादायक निकालानंतर महायुती सरकारने ही योजना आणली. राज्यात ही योजना प्रचंड प्रमाणात यशस्वी झाली. कोट्यवधी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. यातच या योजनेवरून विरोधक महायुती सरकारवर हल्लाबोल करत आहेत. एकीकडे ही योजना बंद केली जाणार असल्याचे दावे करताना दुसरीकडे या योजनेसाठी आश्वासित केलेले २१०० रुपये कधीपासून देणार, अशी विचारणाही करत आहेत. यातच आता बांगलादेशातून घुसखोरी करून मुंबईत राहत असलेल्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एकीकडे बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांबाबत केंद्र सरकार तसेच राज्य सरकार कडक पावले उचलताना पाहायला मिळत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशातील अनेक राज्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर आढळून आले आहेत. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, चर्चिला जात आहे. बांगलादेशातील परिस्थिती बदलल्यानंतर भारतात घुसखोरी करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. यातच मुंबईत बांगलादेशी घुसखोर महिलांनी थेट माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील कामाठीपुरातील एका महिलेने या योजनेचा लाभ घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ बांगलादेशींना अटक केली आहे. याप्रकरणी एका दलालालाही अटक केली आहे. या बांगलादेशी महिलेने भारतात घुसखोरी केली त्यानंतर बनावट कागदपत्रे बनविली आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. एजंटकडून बनावट कागदपत्रे बनवली होती. या एजंटलादेखील अटक करण्यात आली आहे. केवळ मुंबई नाही, तर राज्यातील अन्य अनेक भागातून अशी प्रकरणे समोर येत आहेत.

‘लाडकी बहीण’चा फायदा घेणारे बांगलादेशी भारतात आले कसे?

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा युतीने लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करत सर्व भगिनींना प्रति महिना १५०० हजार रुपये दिले. पण, आता या योजनेचा लाभ चुकीच्या लोकांनी घेतला, या योजनेत त्रुटी आहेत. बांगलादेशींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा साक्षात्कार सरकारला झाला आहे. योजना सुरु करताना सरकारला त्रुटी दिसल्या नाहीत का? बांगलादेशींनी या योजनेचा लाभ घेतला तर हे बांगलादेशी भारतात, महाराष्ट्र आले कसे? केंद्रात मागील ११ वर्षांपासून पंतप्रधान मोदींचे सरकार आहे. मोदी सरकार कमजोर आहे, असे भाजपाला म्हणायचे आहे का? असा प्रश्न विचारून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या सरकारवरच गुन्हा दाखल केला पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकाला पुण्यात अटक केली होती. आरोपी गेल्या २० वर्षांपासून भारतात राहत होता. त्याने बेकायदेशीरपणे भारत-बांगलादेश सीमा ओलांडली होती आणि कोलकातामध्ये जन्म प्रमाणपत्र बनवले होते. यानंतर तो अहमदाबाद आणि मुंबई मार्गे पुण्याला पोहोचला. मुंबई, ठाणे, पुणे आणि भिवंडी येथे बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची प्रकरणे समोर आली आहे. या आरोपींकडे भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट अशी कागदपत्रेही सापडली.
 

Web Title: congress nana patole criticized mahayuti govt over mukhyamantri majhi ladki bahin yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.