“भाजपा महायुतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली, आता ‘लाडका भाऊ’साठी काम करणार”: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 17:48 IST2024-12-09T17:47:49+5:302024-12-09T17:48:08+5:30
Maharashtra Assembly Session December 2024: भाजपा महायुतीला पाशवी बहुमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांची मस्ती दिसत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

“भाजपा महायुतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली, आता ‘लाडका भाऊ’साठी काम करणार”: नाना पटोले
Maharashtra Assembly Session December 2024: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर अनेक सदस्य बोलले. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळ परिसरात मीडियाशी बोलताना महायुती सरकावर टीका केली.
महाराष्ट्र विधिमंडळाला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. अनेकदा काँग्रेसकडे मोठे बहुमत असतानाही त्यावेळी विरोधी पक्षांची सदस्य संख्या न पहाता विरोधी पक्षनेते पद दिले होते. हीच परंपरा लक्षात घेऊन विधान सभेचा विरोधीपक्ष नेता व विधानसभेचा उपाध्यक्ष विरोधी पक्षांचा असावा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत मांडली आहे. सरकारही सकारात्मक असून नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता होईल अशी अपेक्षा आहे, असे नाना पटोले म्हणाले.
भाजपा महायुतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली
‘लाडकी बहीण’मुळेच पुन्हा सत्तेत आलो, असे भाजपा युतीचे नेते सांगत आहेत. पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडकी बहीणचा विषय आता संपला आहे. सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका ‘लाडक्या भावाला’ एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली आहे. ही तर सुरुवात असून ‘आगे आगे देखो होता है क्या? म्हणत महाराष्ट्रात सत्तेत आलेले भाजपा युतीचे सरकार हे ‘लाडक्या भावा’ साठी काम करणारे सरकार आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, भाजपा महायुतीला पाशवी बहुमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांची मस्ती दिसत आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर अभिनंदनाचा ठराव मांडला असता त्यावरच चर्चा होणे अपेक्षित होते. पण सत्ताधारी पक्षातील सदस्य मतदारांची थट्टा करत होते. मारकवाडीप्रमाणे इतर गावातही ग्रामसभा ठराव करत आहेत. मतदार हा राजा आहे, त्याला मताचा अधिकार असून आपले मत कुठे गेले हे जनता विचारत आहे. मारकडवाडीतील लोक मॉक पोलिंग करणार होते तो अधिकार गावकऱ्यांना आहे, तो कोणीही हिरावू शकत नाही. मारकडवाडीच्या मुद्द्यावर सभागृहातही चर्चा झाली पाहिजे पण सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करते, जनभावना ओळखत नाही ही सत्तेची मस्ती आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी निशाणा साधला.