Join us

“सत्तेत गेल्यावर अजित पवार अन् धनंजय मुंडेंनी सरड्यासारखा रंग बदलला”; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 17:37 IST

Maharashtra Monsoon Session 2023: सत्तेत गेलेले लोक वास्तव लपवत आहेत. सत्तेत गेल्यानंतर ते आता वेगळेच वागत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

Maharashtra Monsoon Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने इगतपुरीतील घटना, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी सरड्यासारखा रंग बदलला, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. 

इगतपुरीत एका गरोदर मातेचा मृत्यू झाला. या घटनेचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, अधिवेशनात पुरवण्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आदिवासी भागात रस्ते नाहीत. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. याबाबत आम्ही सभागृहात विषय मांडला. ज्यांच्याकडून पैसे घेता त्यामध्ये आदिवासीही आहेत. पण आदिवासी लोकांना सोयी सुविधा काय देताय? भाजप केवळ मूठभर लोकांना सोयी सुविधा देताहेत. सत्तेचा माज जो भाजपला आला आहे. हा माज लोक उतरवणार, अशी टीका पटोले यांनी केली. 

अजित पवार अन् धनंजय मुंडेंनी सरड्यासारखा रंग बदलला

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी सरड्यासारखा रंग बदलला आहे. सत्तेत गेलेले लोक वास्तव लपवत आहेत. सरड्यासारखे होऊ नका अशी आमची त्यांना सूचना आहे. सरडा हा रंग बदलणारा प्राणी आहे. मी त्यांना सरडा म्हणण्याचे कारणच हे आहे की, सत्तेत गेल्यानंतर ते आता वेगळेच वागत आहेत, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे एका आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. आदिवासी असले म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? सर्वांनाच जगण्याचा अधिकार आहे. हे महाराष्ट्राला भुषणावह नाही. आदिवासी गरोदर महिलेचा हा मृत्यू नसून एकप्रकारची हत्या आहे तसेच शासकीय असंवेदनशीलतेचा बळी आहे. आदिवासी गरोदर महिलेच्या मृत्यूस शासनच जबाबदार आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला. 

 

टॅग्स :महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३नाना पटोलेनाना पटोलेअजित पवारधनंजय मुंडे