काँग्रेसचे आमदार जयपूरकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 02:55 AM2019-11-09T02:55:24+5:302019-11-09T02:55:54+5:30

आमदारांना मोठ्या रकमेच्या ऑफर्स; भाजपचे सरकार नको, पक्षातील अनेकांची भावना

Congress MLA leaves for Jaipur | काँग्रेसचे आमदार जयपूरकडे रवाना

काँग्रेसचे आमदार जयपूरकडे रवाना

Next

मुंबई : आमच्या आमदारांना मोठ्या रकमेच्या ऑफर दिल्या जात आहेत, असा आरोप करत काँग्रेस पक्षाने त्यांच्या ३५ ते ४०आमदारांना जयपूर येथे पाठवले आहे. मात्र ज्येष्ठ नेते मुंबईत थांबले आहेत. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेलेल्या आमदारांना त्यांची भेट होऊ शकली नाही.

गुरुवारी रात्री काँग्रेसच्या काही आमदारांना फोन आले. काही आमदारांना तुम्हाला आम्ही २५ कोटी देऊ, ३० कोटी देऊ अशी आॅफर देण्यात आली आहे. काही आमदारांना तर ५० कोटीची आॅफर दिली गेली, असा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
या घडामोडीमुळे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्रीच पोहोचले. आमदारांना जयपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. अशोक चव्हाण यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना फोनवर सगळी कल्पना दिली. नागपूर, पुणे येथून त्या त्या भागातील आमदारांना मध्यरात्रीच जयपूरला रवाना करण्यात आले.

‘तर वेगळा विचार करण्याची परवानगी द्यावी’
दिल्लीत सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी यशोमती ठाकूर, सुनील केदार, सतेज पाटील यांच्यासह काही आमदार गेले होते. मात्र त्यांना भेट मिळालीच नाही. मात्र या आमदारांनी त्यांच्यासोबत नेलेले ३० ते ३५ आमदारांच्या सहीचे पत्र तेथे दिले. ‘‘आम्हाला महाराष्ट्रात भाजपचे सरकार नको आहे. ते जर आले तर आमची पुढची पाच वर्षे प्रचंड अडचणीत जातील. त्यामुळे आम्हाला अन्य पर्याय शोधू द्यावेत, अन्यथा आम्हाला आमच्या राजकीय भवितव्यासाठी योग्य ते निर्णय घ्यावे लागतील’’ असा आशय त्या पत्रात असल्याचे सांगण्यात आले.

भाजपने सुडाचे राजकारण केले - वडेट्टीवार
भाजपने गेली पाच वर्षे सुडाचे राजकारण केले. एखाद्याला आपल्याकडे वळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर केला. त्यामुळेच काँग्रेसच्या आमदारांना भाजपचे सरकार नको आहे, असे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

खोसकर यांना आॅफर
आपणांस ‘आॅफर’ देण्यात आली, असा दावा काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी केला आहे. ही आॅफर कुणी दिली, किती रकमेची आॅफर होती, या प्रश्नांची उत्तरे त्यांनी टाळली आहेत.

Web Title: Congress MLA leaves for Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.