Join us

बॅनरवरून राहुल गांधी गेले, फडणवीस आले; कोळंबकरही भाजपवासी झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 16:31 IST

काँग्रेसचे आमदार असलेले कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयावरील बॅनरवरुन काँग्रेस नेते गायब झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला आहे. 

मुंबई - सुजय विखे पाटील यांच्यापाठोपाठ आणखी एक काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील वडाळा येथील काँग्रेसचेआमदार कालिदास कोळंबकर हे देखील आगामी काळात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करू शकतात. काँग्रेसचे आमदार असलेले कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयावरील बॅनरवरुन काँग्रेस नेते गायब झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला आहे. 

कालिदास कोळंबकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्र्याचे फोटो लावण्यात आल्याने आगामी काळात कोळंबकर हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कालिदास कोळंबकर हे राणे समर्थक म्हणून प्रसिद्ध आहेत. गिरणगावातील नायगाव या विधानसभेतून सहावेळा कोळंबकर आमदार झाले. शिवसेनेपासून त्यांची राजकीय कारकिर्द सुरुवात झाली असून नारायण राणे यांच्यासोबत त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 

नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश करुन कालिदास कोळंबकर यांनी वडाळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. मात्र नारायण राणे यांच्यासोबत असलेल्या अनेक आमदारांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला मात्र कोळंबकर राणे समर्थक म्हणून नारायण राणे यांच्यासोबत राहिले. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. यानंतर कालिदास कोळंबकर हे देखील राणेंच्या स्वाभिमान पक्षात जातील असं बोललं जातं होतं. मात्र आता बॅनरवरुन कोळंबकर कुठे जाणार हे स्पष्ट झालं आहे. 

माझ्या मतदारसंघातील कामं जो माणूस करतो त्याचा फोटो बॅनरवर लावला असून भविष्यात माझ्या मतदारसंघाचे  प्रश्न सोडवेल त्यांनाच आपला पाठिंबा असेल अशी प्रतिक्रिया कालिदास कोळंबकर यांनी दिली आहे

टॅग्स :लोकसभा निवडणूककाँग्रेसभाजपाआमदारकालीदास कोळंबकर