मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला काँग्रेसच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची दांडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 13:26 IST2020-02-24T13:21:44+5:302020-02-24T13:26:52+5:30
Uddhav Thackeray: महाराष्ट्र भाजपाने यावर ट्विट करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला काँग्रेसच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची दांडी
मुंबई - सीएए मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानामुळे काँग्रेस नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याचेच पडसाद मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे महत्त्वाचे मंत्री अनुपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्र भाजपाने यावर ट्विट करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीत सगळं छान सुरु आहे. फक्त सरकारच्या पत्रकार परिषदेला मंत्रिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे मंत्री उपस्थित नाहीत. बाकी सगळं मस्त चाललंय. मुख्यमंत्र्यांनी सीएए समर्थन केल्याचे पडसाद दिसतायेत असा टोला लगावला आहे.
तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारची दिशाही ठरत नाही आणि सरकारला सूरही गवसत नाही. मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांना सुसंवादासाठी बोलावतात, पण सत्तेतील तीन पक्षांमध्येच संवाद नाही, आधी तो साधा, असा सल्ला देत चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला
महाविकास आघाडी मधे सगळं छान चालू आहे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 23, 2020
फक्त सरकारच्या पत्रकार परिषदेला मंत्रिमंडळातील काँग्रेसचे महत्वाचे मंत्री उपस्थित नसतात
बाकी सगळं मस्त चाललंय!!
मुख्यमंत्र्यांच्या CAA समर्थनाचे पडसाद ??? pic.twitter.com/3lYnsKQcgd
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
मी सीएए, एनपीआर समजून घेतले आहे. त्यामुळे कुणाचेही नागरिकत्व जाणार नाही. केंद्राने प्रसिद्ध केलेली प्रश्नोत्तरेही तपासली. त्यामुळे ज्यांनी आंदोलन भडकावले त्यांनी ते समजून घ्यावे. त्यानंतरच मत बनवावे. मात्र राज्यातील महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही, सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता.
याबाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर भाष्य केले होते. सीएएचा अभ्यास केला पाहिजे, काँग्रेसची भूमिका ऐकून घेतली पाहिजे, त्यानंतरच त्यांनी जी काही भूमिका घ्यायची ती घ्यावी असे आपले म्हणणे आहे. हा कायदा कसा घटनाविरोधी आहे, त्यात ठराविक लोकांना ‘नॉन सिटीझन’ कसे म्हटले गेले आहे आणि ठराविक लोकांना कसे ‘बेकायदेशिर निर्वासित’ म्हटले गेले आहे हे दोन भाग मी त्यांना समजावून सांगेन. डिसेंबर २०१४ च्या आत जे भारतात आले, त्यांच्यासाठी सीएए आहे आणि २०१४ नंतर जे आले त्यांच्याविषयी हा कायदा काहीच सांगत नाही. सीएएचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर जोपर्यंत निर्णय येत नाही, तोपर्यंत शिवसेना आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सीएएवर कोणतीही ठोस भूमिका घेऊ नये असा सल्ला दिला होता.