“पुण्यातील घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली”: हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:46 IST2025-02-26T16:43:16+5:302025-02-26T16:46:28+5:30

Congress Harshwardhan Sapkal News: लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

congress maharashtra state president harshwardhan sapkal criticizes govt over pune incident | “पुण्यातील घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली”: हर्षवर्धन सपकाळ

“पुण्यातील घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातील घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करत होती. स्वारगेट एसटी स्टँड येथे थांबल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. यादरम्यान आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले आणि जवळ उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला. बस बंद असल्याचे लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले आणि स्वतःही बसमध्ये घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केले आणि लगेचच तिथून फरार झाला. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही सरकारवर निशाणा साधला.

राज्यात महिला सुरक्षित नाहीत

पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मध्यंतरी मुंबईत शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. पण त्यातील सत्य बाहेर येऊ नये म्हणून सरकारने आरोपीचा एन्काऊंटर करून प्रकरणातील मुख्य सुत्रधारांना वाचवण्याचाच प्रयत्न केला. सर्वच विषयावर बोलणारे राज्याचे मुख्यमंत्री महत्त्वाच्या विषयावर मात्र जाणीवपूर्वक गप्प बसतात. पुण्यात झालेल्या बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे. दिल्लीत ११ वर्षापूर्वी एका तरुणीवर अत्याचार झाल्याने समाजातून संतप्त भावना व्यक्त झाल्या होत्या. त्यानंतर मोठे जनआंदोलन झाले होते. पुण्याची घटना ही तितकीच गंभीर आहे. सरकार बेफिकीर असल्याने राज्यात महिला सुरक्षित नाहीत असे सपकाळ म्हणाले.  

दरम्यान, या घटनेतील आरोपीचा फोटो समोर आला आहे. दत्तात्रय रामदास गाडे असे त्या नराधमाचे नाव आहे. पुणे पोलिसांचे पथक आरोपी दत्तात्रय गाडेच्या घरी दाखल झाले. मात्र गाडे घरी नसून तो फरार आहे. गाडे याच्यावर पुण्यासह शिरूर मध्ये सुद्धा चोरी, हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं सुद्धा गाडेचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या आठ पथकांडून आरोपीचा शोध सुरु आहे. 

 

Web Title: congress maharashtra state president harshwardhan sapkal criticizes govt over pune incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.