Join us

“भाजपा महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई बुडवली, मुंबईकर माफ करणार नाही”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 13:55 IST

Congress Harshwardhan Sapkal News: एका पावसाने भाजप शिंदे सेना आणि अजित पवारांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

Congress Harshwardhan Sapkal News: मान्सून यंदा १२ दिवस आधीच राज्यात दाखल झाला. ३५ वर्षानंतर पहिल्यांदाच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल झाला. हा एक विक्रम आहे. मुंबईलाही मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपून काढले. सोमवार सकाळपासूनच मुंबई, उपनगरासह अनेक ठिकाणी गडगडाटासह तुफान पाऊस पडला. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक बंद ठेवण्यात आली. सकाळी ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. मुंबईतील अनेक रस्त्यांवरही पाणी साचले. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, काँग्रेस नेत्यांनी भाजपा महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मुसळधार पावसाचा फटका भुयारी मेट्रोलाही बसला. आचार्य अत्रे चौक भुयारी स्थानकात पावसाचे पाणी शिरले. यातच मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी उद्या दिनांक, २७ मे २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत 'रेड अलर्ट' जारी केला आहे. अत्यावश्यक गोष्ट नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना केले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली आहे.

महाभ्रष्ट भाजपा महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली

महाभ्रष्ट भाजपा महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली. मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महापालिकेतील प्रशासनराजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहत आहे. पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली असून मुंबईच्या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. ठिकठिकाणी पाणी साचून मुंबई तुंबली आहे. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी आहे. एका पावसाने भाजप शिंदे सेना आणि अजित पवारांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. यांचे कर्तृत्त्व इतके महान आहे की आगामी निवडणुकीत लोकांची मते मागायला यांना बोटीनेच घरोघरी जावे लागेल असे दिसतेय. मुंबईला लुटणा-या या भ्रष्ट टोळीला  मुंबईकर माफ करणार नाहीत, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. 

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी आरे ते आचार्य अत्रे चौक वरळी नाका या मार्गावरील मेट्रो लाईन ३ वाहतूक सेवा सुरू करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, पहिल्याच पावसात वरळीतील भुयारी रेल्वे स्थानकात पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. यामुळे भुयारी मेट्रो स्थानक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊसकाँग्रेसहर्षवर्धन सपकाळ