Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र सरकारची चलाख खेळी; विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाआधीच विश्वास ठरावाची 'गुगली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 14:07 IST

हरिभाऊ बागडेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असलेले विरोधक सत्ताधाऱ्यांच्या खेळीने 'क्लीन बोल्ड' झाले आहेत.

मुंबईः विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विश्वास ठराव आणून तो आवाजी मतदानाने मंजूर करण्याची चलाख खेळी आज सत्ताधाऱ्यांनी केली. या गुगलीमुळे, बागडेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असलेले विरोधक 'क्लीन बोल्ड' झाले.  

विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधकांनी ५ मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यासह ३५ आमदारांच्या सह्या होत्या. अर्थात, हा प्रस्ताव सभागृहात मांडण्यास त्यांना मंजुरी मिळाली नव्हती. विरोधक या मंजुरीच्या प्रतीक्षेत असतानाच, आज सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर कुरघोडी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरिभाऊ बागडे यांच्यावर विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला शिवसेना नेते आणि मंत्रिमंडळातील सहकारी एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिलं. पुढच्या काही मिनिटांतच आवाजी मतदानानं हा ठराव मंजूर झाला. या खेळीमुळे विरोधक चांगलेच खवळले, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.  

काय घडलं होतं?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपासून आपणास बोलू दिले जात नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. ५ मार्च रोजी कामकाज सुरू झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपावरून भाजपा सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली  होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी दोन्ही सभागृहांतील प्रमुख नेत्यांची संयुक्त समिती नेमण्याची सूचना केली होती. अजित पवारांनी ती तात्काळ मान्य करत, कामकाज सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं होतं.

तहकुबीमुळे संतापलेल्या विरोधकांची विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या दालनात बैठक झाली होती. त्यात अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय झाला होता. तसा प्रस्ताव सादर करण्यात आला. विधिमंडळाचे सभागृह सार्वभौम असून विधानसभा अध्यक्षांनी सर्व सदस्यांना मते मांडण्याची संधी द्यायला हवी. परंतु बागडे यांची वर्तणूक सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षासारखी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला होता. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांची वागणूक हुकुमशाही प्रवृत्तीची आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला होता. 

टॅग्स :हरिभाऊ बागडेमहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकार