कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाचे पन्नास टक्के भुयारीकरण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 04:45 PM2019-06-10T16:45:33+5:302019-06-10T16:50:05+5:30

मुंबईची नवीन जीवनवाहिनी म्हणून आकार घेत असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशने (एमएमआरसी) मेट्रो-३ मार्गिकेचा अवघ्या १९ महिन्यात ५० टक्के भुयारीकरणाचा टप्पा गाठला आहे.

Colaba-Bandra-Seepz Metro-III work in progress | कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाचे पन्नास टक्के भुयारीकरण पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाचे पन्नास टक्के भुयारीकरण पूर्ण

googlenewsNext

मुंबईमुंबईची नवीन जीवनवाहिनी म्हणून आकार घेत असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशने (एमएमआरसी) मेट्रो-३ मार्गिकेचा अवघ्या १९ महिन्यात ५० टक्के भुयारीकरणाचा टप्पा गाठला आहे. या मार्गासाठी एकूण ५६ किमीचे (अप आणि डाऊन) भुयारीकरण करायचे असून हा मार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास मेट्रो-३ चे प्रशासन कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ हा मुंबईच नव्हे तर भारतातील सर्वात लांब संपूर्णत: भुयारी मेट्रो मार्ग आहे. या आर्थिक राजधानीत अतिशय दाटीवाटीच्या ठिकाणी भुयारीकरण करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. हा प्रकल्प गतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी मेट्रो-३ प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी जागतिक दर्जाच्या सुरक्षा मानकांचा वापर करण्यात येत आहे. यामुळे कोणताही अपघात न होता केवळ १९ महिन्यात ५० टक्के काम पूर्ण करण्यात आलेले आहे. यशाचा हा पल्ला गाठणे ही सर्वच मुंबईकरांसाठी आनंदाची बाब आहे, असे एमएमआरसीतर्फे स्पष्ट करण्यात आले. 


 याप्रसंगी प्रतिक्रिया देताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, ‘‘भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीत मुंबईतील अतिशय जुन्या इमारती, मिठी नदी, व उन्नत मुंबई मेट्रो-१ याखालून भुयारीकरण करणे जिकिरीचे आहे. विशेष म्हणजे सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड न करता सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आम्ही हे काम पूर्ण केलेले आहे. प्रकल्प सल्लागार, कंत्राटदार या सर्वांचा या यशात सहभाग आहे. भुयारीकरणाप्रमाणे खोदकाम, बेस स्लॅब, कॉनकोर्स स्लॅब, कॉलम तसेच भिंतींची बांधणी यासारखी कामे देखील युद्धपातळीवर सुरू आहेत. 

 मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम द्वारे नियमितपणे घेतला जाणारा आढावा, विविध भागीदारी संस्थांचे सहकार्य आणि मुंबईकरांच्या भक्कम पाठींब्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण करु असा विश्वास आहे."

येथे झाले भुयारीकरणाचे १३ टप्पे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सप्टेंबर २०१७ मध्ये नयानगर लॉचिंग शाफ्टमध्ये कृष्णा-१ हे टीबीएम उत्तरविल्या नंतर दिनांक ६ नोव्हेंबर २०१७ पासून प्रत्यक्ष भुयारीकरणाला सुरुवात झाली. मुंबईच्या भूगर्भात एकूण १७ टीबीएम्स सध्या कार्यरत आहेत. भुयारीकरणाचा पहिला टप्पा सप्टेंबर २०१८ रोजी पार पडला त्यानंतर केवळ ८ महिन्यात एकूण १२ टप्पे पार पडले आहेत. आतापर्यंत सीप्झ येथे १, सीएसएमआयए-टी २ येथे २, सहार, एमआयडीसी ,वरळी आणि आंतरदेशीय विमानतळ येथे प्रत्येकी १ तर दादर, विद्यानगरी आणि विधानभवन येथे २ अशा प्रकारे भुयारीकरणाचे एकूण १३ टप्पे पार पडले आहेत.

टीबीएम्स भूगर्भात उतरविण्यासाठी कफ परेड, इरॉस सिनेमा, आझाद मैदान, सायन्स म्युझियम, सिद्धिविनायक, नयानगर, बिकेसी, विद्यानगरी, पाली मैदान, सारिपुत नगर, सहार रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी २ येथे लॉचिंग शाफ्ट बांधण्यात आले आहेत.

‘‘एकूण भुयारीकरणापैकी आजवरचा सर्वात मोठा भुयारीकरणाचा टप्पा विद्यानगरी ते आंतरदेशीय विमानतळ (३.९ किमी) हा असून सर्वात लहान सारिपुत नगर ते सीप्झ (५६२ मीटर) हा आहे. २८ किमी भुयारीकरणासाठी एकूण १९,४९५ सेगमेंट रिंग्सचा वापर झाला आहे. हे सेगमेंट रिंग्स मुंबईतील ६ कास्टिंग यार्ड मध्ये तयार होत आहेत ज्यापैकी ४ वडाळा, १ माहुल तर १ जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथे आहे. एकूण ३३.५ किमीच्या मार्गिकेवरील उर्वरित ५०% भुयारीकरण आणखी १९ टप्प्यात पूर्ण होईल" असे मुं.मे.रे.कॉचे प्रकल्प संचालक  एस.के. गुप्ता म्हणाले.

Web Title: Colaba-Bandra-Seepz Metro-III work in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.