Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी सीबीआयशी लढतोय अन् तुम्ही माझ्याशी लढण्याची भाषा करता; मुख्यमंत्र्यांकडून दिल्लीत नाराजी व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 08:05 IST

पक्षाचे प्रभारी आणि सरचिटणीस एच. के. पाटील तसेच के. सी. वेणुगोपाल यांच्यासमवेत दीर्घ बैठक झाली. या बैठकीच्या मागे मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केलेली नाराजी होती.

- अतुल कुलकर्णी मुंबई : ‘मी ईडी आणि सीबीआयशी लढत आहे, आणि तुम्ही माझ्याशीच लढण्याच्या गोष्टी करता? हे कितपत योग्य आहे? अशाने सरकार कसे चालेल?’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत बोलावून स्पष्ट शब्दांत समज देण्यात आल्याचे वृत्त आहे.

सतत स्वबळाची भाषा करणारे पटोले  यांना दिल्लीत हायकमांडने तातडीने बोलावून घेतले. पक्षाचे प्रभारी आणि सरचिटणीस एच. के. पाटील तसेच के. सी. वेणुगोपाल यांच्यासमवेत दीर्घ बैठक झाली. या बैठकीच्या मागे मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केलेली नाराजी होती. मुंबईत ठाकरे यांनी पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

सरकारमध्ये असणारे मंत्री आणि आपल्या तिन्ही पक्षातील नेत्यांच्या मागे सीबीआय, ईडी यांचा ससेमिरा लावला जात आहे. असे असताना जनतेत तिन्ही पक्षांच्या ऐक्याचा संदेश कसा जाणार? असा थेट सवाल ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांकडे केला होता. या दोन्ही नेत्यांनी हा विषय एच. के. पाटील यांच्यापुढे मांडला. तरीही पटोले यांनी स्वबळाचा नारा सुरू ठेवल्याने ठाकरे यांनी दिल्लीत थेट सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली.

वेणुगोपाल यांनी नाना पटोले आणि एच. के. पाटील यांना दिल्लीत बोलावून घेतले. सोनिया गांधी यांची तीव्र नाराजी या दोन्ही नेत्यांनी पटोले यांना सांगितली. त्यानंतर पटोले यांनी या विषयावरून यू-टर्न घेतला. पाटील यांनीदेखील आपण एकत्रित काम करू, योग्य ती समज देण्यात आली आहे, असा संदेश मुख्यमंत्री ठाकरे यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेनाना पटोलेकाँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडी