Join us  

'जनता कर्फ्यू'चे दिवस वाढवणार; संजय राऊतांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 12:15 PM

कोरोनाचा वाढता आकडा रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. आज देशभरात जनता कर्फ्यू  नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळात आहे.

मुंबई: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. 63 वर्षीय व्यक्तीचा मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 74 वर गेली असून, मुंबई 6 आणि पुण्यात 4 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र आजचा जनता कर्फ्यू 8 दिवसांपूर्वीच कठोरपणे लादायला हवा होता असं मत शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, कोरोनाचा वाढता आकडा रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. आज देशभरात जनता कर्फ्यू  नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळात आहे. मात्र आजचा जनता कर्फ्यू 8 दिवसांपूर्वीच कठोरपणे लादायला हवा होता असं माझं वैयक्तिक मत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच राज्यातील जनतेने अजूनही कोरोनाबाबत गांभीर्य घेतले नाही. इटलीमध्ये दिवसेंदिवस कोरोना ज्या वेगाने पसरला ते पाहून नागरिकांनी सतर्क होणं आवश्यक आहे असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आजच्या लादण्यात आलेल्या जनता कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेऊ शकतात असं मत देखील संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

कोरोनामुळे आज मुंबईत आणखी एकाचा मृत्यू झाला. एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना एका ६३ वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना बळींची संख्या दोनवर गेली आहे. 19 मार्चला त्या व्यक्तीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं. देशातील हा कोरोनानं दगावलेला पाचवा बळी आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. खासकरून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथे 31 मार्चपर्यंत खासगी ऑफिस आणि दुकाने बंद राहणार आहे. मात्र, यादरम्यान अत्यावश्यक सेवा म्हणजेच बँका, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, किराणा मालाचे दुकान, दुधाचे दुकान, रुग्णालये, छोटे रेस्टॉरंट सुरु राहणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जनता कर्फ्यूचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. आज (रविवारी) सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी करण्यात आली आहे. या काळात मुंबई व काही शहरांतील उपनगरी सेवा वगळता, एकही रेल्वेगाडी धावणार नाही. बहुतांश विमान उड्डाणे बंद असतील आणि परदेशांतून येणाऱ्या सर्व विमानांना भारतात उतरण्यास शनिवार मध्यरात्रीपासूनच बंदी घालण्यात आली आहे. शिवाय प्रवासी असतील, तरच एसटीच्या बसेस सोडण्यात येतील. कोरोना विषाणूचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ नये आणि घरीच थांबावे, यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची कल्पना मांडली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लोकांनी या कर्फ्यूमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरेसंजय राऊतमहाराष्ट्र सरकार