Join us  

राज ठाकरेंची दिल्लीवारी, महायुतीत सहभागी होणार? CM शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 8:40 AM

CM Eknath Shinde Reaction on MNS Chief Raj Thackeray Visit Delhi: राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

CM Eknath Shinde Reaction on MNS Chief Raj Thackeray Visit Delhi: आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांची लगबग वाढलेली दिसत आहे. उमेदवारी, जागावाटप निश्चित करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती आमनेसामने असून, मित्र पक्ष किंवा घटक पक्षांना काय मिळेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत गेले आहेत. यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात असून, राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत.

राज्यातील महायुतीत सामील होऊन लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. चार दिवसांत दुसऱ्यांदा दिल्लीत आलेल्या राज ठाकरे यांच्या महायुतीतील सहभागावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. मनसेला लोकसभेच्या किती जागा मिळतील याकडे लक्ष लागलेले आहे. यातच मीडियाशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

निश्चितपणे योग्य निर्णय होईल

राज ठाकरे आणि आमची विचारधारा एकच आहे. एकाच विचाराचे आम्ही सगळे आहोत. त्यामुळे निश्चितपणे योग्य निर्णय होईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, सोमवारी रात्री साडेनऊ वाजता राज ठाकरे हे त्यांचे पुत्र अमित ठाकरे तसेच अन्य सहकाऱ्यांसोबत चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले. अमित शाह यांच्या निवासस्थानापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हॉटेल ताज मानसिंह येथे ते उतरले आहेत. राज-शाह बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मनसे सहभागी झाल्यास महायुतीला बळ मिळेल. दक्षिण मुंबईसह मनसेला आणखी कोणते मतदारसंघ दिले जातात, याची उत्सुकता असून, मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नाशिक, पुणे या मतदारसंघांत मनसेची महायुतीला मदत होऊ शकते. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४मनसेराज ठाकरेभाजपाएकनाथ शिंदे