“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 22:44 IST2025-09-16T22:41:55+5:302025-09-16T22:44:34+5:30

CM Devendra Fadnavis: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ब्रँड आहे, तुम्ही ब्रँड नाही, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.

cm devendra fadnavis slams thackeray bandhu over best election 2025 result and brand defeat | “बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका

“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका

CM Devendra Fadnavis: आमच्याकडे सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष होतो. आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड झाला. जगातील सर्वात मोठा ब्रांड आमच्याकडे आहे त्याचे नाव नरेंद्र मोदी आहे. अमित साठम यांनी ब्राह्मोस मिसाईल सारखा विरोधकांवर हल्ला चढविला. आपल्याला कोणी आता थांबवू शकत नाही. मागच्या वेळी थोडक्याने वाचलो होतो, दोनच कमी पडले होते. आपल्याला माहिती आहे की कमी पडल्यावर काय करायचे ते. आम्ही लढणारे आहोत रडणारे नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मनपा निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

मुंबईत आयोजित भाजपा विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांची इच्छा होती की, महापौर आमचा असावा. आपण क्षणाचा ही विलंब लावला नाही. आपण सगळ्यांना बोलवले तेव्हा सगळे बोलले एक पाऊल मागे घेऊन त्यांना महापौर देऊ. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष  सगळे तुम्ही घ्या. आम्ही विरोधक म्हणून काम करणार नाही, पण जर तुम्ही कुठे चुकलात, तर आम्ही अंकुश ठेऊ. पण २०१९ ची निवडणूक आली आणि मग मला गाणे गावे लागले की, “अछा सिला दिया तूने मेरेप्यार का यार ने ही लूट लिया घर यार का”, असे सांगत मागील निवडणुकीत काय झाले, याचे स्मरण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिले.

२०२२ ला गनिमी कावा दाखविला, २०२४ ला पूर्ण बहुमताचे सरकार आणले

२०२२ ला आम्ही गनिमी कावा दाखविला. २०२४ ला आम्ही पूर्ण बहुमताचे सरकार आणले. काहीही झाले तरी मुंबईत महायुतीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही, कोणी सोबत आले तरी कोणी सोबत आले नाही तरी. मुंबईत महायुतीचा महापौर केल्याशिवाय भाजपाचा एकही कार्यकर्ता राहणार नाही. आज माझे शब्द लिहून घ्या. व्हिडिओ रेकॉर्ड करा. तो जपून ठेवा आणि नंतर सगळीकडे दखवा की काहीही झाले तरी मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार आहे. काहीही झाले तरी मुंबई पालिकेवर महायुतीचेच सरकार येणार, असा निर्धार फडणवीस यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, खरे म्हणजे काही लोक आपले हसे करून घेतात. साधी बेस्टची निवडणूक होती. आम्ही सांगितले की, कशाला पक्षावर लढायचे? मात्र, काहीजण म्हणाले की आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. पण आमच्या शंशाक राव आणि प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर यांनी बेस्टच्या निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजवला. अरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ब्रँड आहे, तुम्ही ब्रँड नाही, या शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.

 

Web Title: cm devendra fadnavis slams thackeray bandhu over best election 2025 result and brand defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.