उद्धव ठाकरे महाकुंभमेळ्यात गेले नाही, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सनातन धर्मावर विश्वास...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 15:09 IST2025-02-28T15:07:20+5:302025-02-28T15:09:55+5:30
CM Devendra Fadnavis PC News: उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा आत्मपरीक्षण करून एकदा आरसा पाहावा. उद्धव ठाकरे अनेक गोष्टी बोलत असतात, त्याला रोज उत्तरे द्यायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

उद्धव ठाकरे महाकुंभमेळ्यात गेले नाही, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सनातन धर्मावर विश्वास...”
CM Devendra Fadnavis PC News: जगातील सर्वांत मोठ्या स्वरुपाचा धार्मिक सोहळा असलेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप झाला. या दिवशी सुमारे १.४४ कोटी लोकांनी पवित्र स्नान केले. तर १३ जानेवारी २०२५ पासून ४५ दिवस सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात ६६.२१ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. हर हर महादेवच्या जयघोषाने महाकुंभमेळ्याचा परिसर निनादला होता. या महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून विविध पक्षांचे राजकीय नेते, दिग्गज मंडळी, सेलिब्रिटींनी आवर्जून सहभागी होत गंगास्नान केले. या महाकुंभाने अनेक जागतिक विक्रमांना गवसणी घातली असून, याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही घेण्यात आली. परंतु, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे महाकुंभमेळ्यात गेले नाहीत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
पूर्वी नमस्कार करताना रामराम करायचो, त्याचे श्रीराम कधीपासून म्हणायला लागलो, याचा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राशी गद्दारी करून काही जणांनी गंगेत डुबक्या मारल्या. त्यांनी कितीही डुबक्या मारल्या तरी त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यांनी जे पाप केले आहे ते धुतले जाणार नाही. मला आता गंगेचे पाणी देण्यात आले. मला मान आहे. सन्मान आहे. इकडे ५० खोके घेतले आणि तिकडे गंगेत डुबकी मारली याला काही अर्थ नाही. गंगेत जाऊन कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा डाग तसाच राहणार आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला.
ज्याला हिंदू जीवन पद्धती प्रिय आहे, असे सगळे लोक महाकुंभमेळ्यात गेले
महाकुंभमेळ्यात विरोधकांनीही सहभाग घेतला. अगदी रोहित पवारांपासून अनेक नेते प्रयागराजला जाऊन गंगास्नान करून आले. परंतु, उद्धव ठाकरे महाकुंभमेळ्यात गेले नाहीत, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्याचा सनातन धर्मावर विश्वास आहे, ज्याला हिंदू जीवन पद्धती प्रिय आहे, असे सगळे लोक महाकुंभमेळ्यात गेले. काही लोक नाही, गेले त्याची वेगळी कारणे असू शकतात. कुणी गेले नाही म्हणजे त्यांचे सनातन धर्मावर प्रेम नाही, असे मी म्हणणार नाही. त्यांची आपली काही कारणे असतील. जे गेले त्यांचे प्रेम आहे, असे समजूया. केवळ दाखवण्यासाठी गेले नाही, असेही आपण समजूया, अशी संयमित प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आत्मपरीक्षण करा आणि आधी आरसा पाहिला पाहिजे
उद्धव ठाकरे अशा गोष्टी बोलत असतात. उद्धव ठाकरे काय बोलतात, त्याला रोज उत्तरे द्यायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा आत्मपरीक्षण केले पाहिजे. समजा तेच खरे होते आणि हे जर गद्दार होते, तर महाराष्ट्रातील जनतेने गद्दारांना मतदान केले का? हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना निवडून दिले आणि शिवसेना म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केले, त्याला तुम्ही गद्दार म्हणत आहात. तुम्ही आधी आरसा पाहिला पाहिजे, असे माझे मत आहे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.