“RSS कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने असूया, मळमळ”; CM फडणवीसांचा राज ठाकरेंच्या टीकेवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:00 IST2026-02-10T14:56:03+5:302026-02-10T15:00:48+5:30
CM Devendra Fadnavis Replied Raj Thackeray Over Criticism On RSS: RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.

“RSS कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने असूया, मळमळ”; CM फडणवीसांचा राज ठाकरेंच्या टीकेवर पलटवार
CM Devendra Fadnavis Replied Raj Thackeray Over Criticism On RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजर होते. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक आंदोलनांना 'आजार' संबोधले. यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. या विधानावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोहन भागवत यांच्या या विधानाचा समाचार घेतला. संघाच्या राजकीय हस्तक्षेपावरही सडकून टीका केली. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर स्पष्ट शब्दांत पलटवार केला.
मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला जी मान्यवरांची गर्दी झाली होती, ती त्यांच्या प्रेमापोटी नव्हती तर, नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे होती. रटाळ प्रवचनांना लोक का येतील?, अशी खोचक विचारणाही राज ठाकरे यांनी केली. मोहन भागवत यांनी भाषेबाबत केलेल्या भाष्यावर राज ठाकरे यांनी निशाणा साधला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.
निमंत्रण मिळाले नाही, म्हणून त्यांना वाईट वाटत आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम आणि मोहन भागवत यांच्या विधानावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझे तर अगदी स्पष्ट मत आहे की, ज्या लोकांना निमंत्रण मिळाले नाही, म्हणून त्यांना वाईट वाटत आहे. म्हणून ज्यांना निमंत्रण मिळाले, त्यांच्यावर टीका करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. १०० वर्षे पूर्ण झाल्याबाबत संघाच्या संदर्भात लोकांना वाद, अपवाद किंवा स्पष्ट माहिती मिळावी, लोकांच्या मनातील प्रश्न दूर व्हावेत. याकरिता समाजाच्या विविध क्षेत्रातील, विविध जाती-समाजाचे, विविध उद्योग क्षेत्रातील असे सगळे लोक निमंत्रित केले होते, असे फडणवीस यांनी सांगितले.
RSS कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने असूया, मळमळ
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आपण पाहिले असेल, तर बहुतांश लोक असे होते की, ज्यांचा कधीही संघाशी संबंध आलेला नाही. विशेषतः दोन दिवस माननीय, पूजनीय सरसंघचालकांनी केवळ मार्गदर्शन केले नाही, तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले. जी उत्तरे दिली आहेत, त्यामुळे संघविरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकाने बंद होणार आहेत, यामुळे अनेकांना कोणाला तळमळ वाटते, कोणाला मळमळ होतेय, वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे अनेक लोक यावर बोलत आहेत. मला असे वाटते की, यासंदर्भात त्या सगळ्यांची असूया एवढीच असावी की, आम्हाला का बोलावले नाही, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
दरम्यान, दोन दिवसीय कार्यक्रमात एकतर्फी चर्चा झाली नाही, दोन्ही बाजूंनी संवाद झाला. या कार्यक्रमात संघाच्या प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली. संघाबाबत असलेल्या काही समजुती, गैरसमज यांचे निराकरण करण्यात आले. सर्वांचे प्रश्न आणि शंका सरसंघचालकांनी ऐकून घेतले आणि उत्तरे दिली. असे कोणतेही संघटन नसेल, जे त्या संघटनेच्या विचारांशी सहमत नसलेल्या, संबंध नसलेल्या लोकांना निमंत्रणे देत असेल आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंका-समाधान करत असेल. संपूर्ण जगात सर्वांत मोठ्या असलेल्या संघाचे प्रमुख अशी गोष्ट करत असतील, तर ती खूप मोठी गोष्ट आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.