मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडींवर विधानसभेत प्रश्न; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 15:44 IST2026-02-28T15:40:33+5:302026-02-28T15:44:07+5:30
Mumbai Pune Expressway Traffic News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडींवर विधानसभेत प्रश्न; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
Mumbai Pune Expressway Traffic News: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टँकर उलटला. टँकरमधून सुरू असलेल्या वायूगळतीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक पूर्णतः बंद ठेवल्याने ३० तास महामार्ग ठप्प राहिला. परिणामी, द्रुतगती महामार्गासह जुना मुंबई-पुणे महामार्गही प्रभावित होऊन २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. याला मंत्री प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर जी घटना घडली, त्यानंतर जी वाहतूक कोंडी झाली, त्यावर आम्ही सगळे व्यक्त झालो. माझा प्रश्न आहे की, यापुढेही अशा घटना घडू शकतात. अशा कंपन्यांची वाहतूक वेगवेगळ्या शहरांमधून सुरू असते. असे अपघात झाल्यानंतर आपल्या एमएसआयडीसी आणि गृहखात्याकडून हॅझमॅट आणि अग्निशमन यंत्र तयार करणार का, काय उपाययोजना करण्यात येणार, असा प्रश्न उद्धवसेनेचे सदस्य आदित्य ठाकरे यांनी विचारला. यावर बोलताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, ही वस्तुस्थिती आहे आणि तशा प्रकारची यंत्रणा उभारण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ही जी घटना झाली, ती घटना झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे की, आपल्याकडे अशा प्रकारे वाहतूक करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडेही या प्रकारची घटना घडल्यावर काय करावे, याचे तंत्रज्ञान नाही. या घटनेतून आपण हा धडा घेतला. असे अपघात झाले की, त्यानंतर काय करावे, यासाठी आपल्याकडे एसओपी नाही. त्या कंपन्यांकडेही नाही आणि आपल्याकडेही नाही. त्यामुळे आपण आदेश दिले आहेत आणि कंपन्यांनाही सांगितले, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकारची वाहतूक करणाऱ्या कंपन्या बहुतांश केंद्र सरकारच्या आहेत. या कंपन्यांनी असा अपघात घडल्यावर काय केले पाहिजे, याचे उपाय, उपकरणे असली पाहिजेत. टँकर लीक झाला तर काय करायचे, त्याला कसे लगेच मोकळे करायचे, अशी घटना घडल्यावर एसओपी काय असली पाहिजे, हे ठरवण्याचे आदेश त्यांना आपण दिले आहेत, असेही ते म्हणाले.