आता भाजपाचेच बंडखोर म्हणताहेत, "५० खोके, एकदम ओके", शिंदेंच्या उमेदवारांची कोंडी, प्रकरण पोलीस ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:24 IST2026-01-09T12:17:47+5:302026-01-09T13:24:11+5:30
भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर आणि शिंदे गटाच्या पूजा कांबळे यांच्यातील वाद पोलीस ठाण्यात

आता भाजपाचेच बंडखोर म्हणताहेत, "५० खोके, एकदम ओके", शिंदेंच्या उमेदवारांची कोंडी, प्रकरण पोलीस ठाण्यात
BJP Shilpa Keluskar: मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणांगणात शीव-कोळीवाडा येथील प्रभाग क्रमांक १७३ मध्ये राजकारणाचे एक अजब नाट्य पाहायला मिळत आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या प्रभागात चक्क एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर आणि शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार पूजा कांबळे यांच्यातील हा वाद आता पोलीस ठाणे आणि न्यायालयापर्यंत पोहोचला असून, या भांडणात भाजपकडून विरोधी घोषणाबाजी करण्यात येत आहे.
हायकोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
शिल्पा केळुसकर यांनी कलर झेरॉक्स केलेला एबी फॉर्म सादर केल्याचा आरोप करत रामदास कांबळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या निवडणूकविषयक याचिकांवर सुनावणी घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. यामुळे केळुसकर यांची उमेदवारी तूर्तास कायम असून, भाजपच्या अधिकृत चिन्हामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.
'५० खोके'च्या घोषणांनी वातावरण तापले
प्रचाराच्या मैदानात हा वाद अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचला आहे. भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर यांचे पती आणि समर्थक चक्क शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पाहून ५० खोके, एकदम ओके अशा घोषणा देत आहेत. विरोधकांनी शिंदे गटावर केलेल्या या आरोपांचा वापर आता महायुतीचाच एक घटक पक्ष दुसऱ्या विरोधात करत असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
बंडखोर उमेदवाराने निर्माण केलेले तगडे आव्हान पाहता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. बुधवारी त्यांनी शीव कोळीवाडा येथे जाहीर सभा घेऊन पूजा कांबळे यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन केले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त असताना, शिवसेना (ठाकरे) गटाच्या उमेदवार प्रणिता वागधरे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. महायुतीची मते दोन गटांत विभागली गेल्याचा थेट फायदा ठाकरे गटाला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.