Vidhan Parishad News: महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. लाडकी बहीण, आनंदाचा शिधा तसेच अन्य काही योजनांवरून विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. विधान परिषदेतही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य विविध मुद्द्यावरून आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या पीएफच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती मिळाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ तसेच ग्रॅच्युइटीच्या थकीत रकमेबाबत ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब आमि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. यावर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले. पीएफ व ग्रॅच्युइटीची २,२१४.४७ कोटी रुपये इतकी रक्कम अदा करणे बाकी आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार आम्ही ती अदा करू, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे अन्य कुठेही वापरणे गुन्हा, तत्काळ पैसे जमा करा
कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे असे कुठेही वापरता येत नाहीत. हा फौजदारी गुन्हा आहे. ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे इतरत्र व पगारावर वापरले असतील त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा. तसेच कर्मचाऱ्यांचे पैसे तात्काळ जमा करा, असे अनिल परब यांनी सांगितले. यावर बोलताना, महामंडळाची ६४ कोटी रुपयांची मासिक तूट आहे. शासनाकडून आम्हाला ५८२ कोटी रुपये येणे बाकी आहे. मानव विकास योजनेचे २६८ कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे. परंतु, सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की, कर्मचाऱ्यांच्या पीएफवरील व्याजाच्या रकमेचे नुकसान झालेले नाही. त्यांचे व्याज जमा केले जात आहे. कोणाचेही नुकसान होणार नाही. एकाही कर्मचाऱ्याचा भविष्य निर्वाह निधी इतरत्र कुठेही खर्च झालेला नाही, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
दरम्यान, मध्यंतरी एसटी कामगारांचा संप झाला. तरीदेखील आम्ही कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे. दुसऱ्या बाजूला भविष्य निर्वाह निधीसंदर्भात आमच्याकडे एकही तक्रार आलेली नाही. एसटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा कुठल्याही प्रकारचा एकही रुपया इतरत्र खर्च केला जाणार नाही. काही स्थितीत, किवा वेगळ्या वातावरणानुसार, राज्य शासनाच्या निधीअभावी काही गोष्टी घडत असतात. परंतु, पैसे कामगारांच्या खात्यावर गेले आहेत आणि व्याजही जमा करण्यात आले आहेत, असे प्रताप सरनाईक म्हणाले.