सिटी सेंटर मॉलला आग; ३,५०० रहिवाशांचे स्थलांतर; अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 06:16 AM2020-10-24T06:16:21+5:302020-10-24T07:03:08+5:30

सिटी सेंटर मॉल तळमजला अधिक तीन मजल्याची इमारत आहे. गुरुवारी रात्री ८ वाजून ५३ मिनिटांनी मॉलला लागलेली आग सुरुवातीला छोटी होती. मात्र रात्री अकरानंतर आगीचा भडका उडण्यास सुरुवात झाली.

City Center Mall fire; Evacuation of 3,500 residents; Five firefighters were injured | सिटी सेंटर मॉलला आग; ३,५०० रहिवाशांचे स्थलांतर; अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी

सिटी सेंटर मॉलला आग; ३,५०० रहिवाशांचे स्थलांतर; अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी

googlenewsNext

मुंबई :मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत श्यामराव बंजारा, रवींद्र प्रभाकर चौगुले, भाऊसाहेब बदाने, संदीप शिर्के आणि गिरकर हे अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी झाले. तर या मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या ५५ मजली इमारतीमधील अंदाजे ३,५०० रहिवाशांना सुरक्षेसाठी  जवळच्या मैदानात स्थलांतर केले.

सिटी सेंटर मॉल तळमजला अधिक तीन मजल्याची इमारत आहे. गुरुवारी रात्री ८ वाजून ५३ मिनिटांनी मॉलला लागलेली आग सुरुवातीला छोटी होती. मात्र रात्री अकरानंतर आगीचा भडका उडण्यास सुरुवात झाली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी अग्नी विमोचन वाहने रवाना केली. मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याने आग विझविण्यात अडचणी येत हाेत्या. प्रारंभी दुसऱ्या मजल्यावर आग लागली. तेथे मोबाइल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचरचे गाळे आहेत. ही आग हळूहळू तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. आग विझविण्यासाठी २४ फायर इंजीन, १६ जंबो टँकरसह एकूण ५० अग्नी विमोचक वाहने कार्यरत होती. गुरुवारी रात्रभर आग विझविण्याचे काम सुरू होते. मोठ्या प्रमाणावर आग पसरल्याने गुरुवारी मध्यरात्री २ वाजून ४१ मिनिटांनी ही आग ब्रिगेड कॉलस्तराची असल्याची अग्निशमन दलाने घोषित केले. 

अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यासह सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी आग विझविण्यासाठी प्रयत्न करत होते. 

शुक्रवारची पहाट उजाडली तरी ती विझविण्याचे काम सुरूच हाेते. अग्निशमन दलाच्या मदतीला वाहतूक तसेच पोलिसांनाही तैनात करण्यात आले होते. आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंचा मार्ग वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला हाेता. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

दुर्घटनेच्या चौकशीचे पालकमंत्र्यांचे आदेश 
मुंबई सेंट्रल येथील सिटी मॉल दुर्घटनेचे मुंबई शहराचे पालकमंत्री व मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्याेग व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी दुपारी भेट देऊन पाहणी केली. तसेच दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले.

Web Title: City Center Mall fire; Evacuation of 3,500 residents; Five firefighters were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.