इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 06:21 IST2025-11-06T06:20:13+5:302025-11-06T06:21:08+5:30
१४ ऑगस्ट २०१९ रोजी पालिकेच्या परिपत्रकाच्या आधारे निवृत्त सैनिकाला त्याचा व्यवसाय करण्यापासून अडविण्यात आले होते

इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गॅस, स्टोव्ह किंवा ग्रिलच्या मदतीने फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाई करणारे २०१८ चे मुंबई महापालिकेचे परिपत्रक ‘इलेक्ट्रॉनिक इंडक्शन व्हेसल्स’ वापरणाऱ्यांना लागू होत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिला.
एका माजी सैनिकाला इलेक्ट्रॉनिक इंडक्शन भांड्यात मासे तळून ते विकण्यापासून रोखण्यात आल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या एकलपीठापुढे याचिकेवर सुनावणी होती. १४ ऑगस्ट २०१९ रोजी पालिकेच्या परिपत्रकाच्या आधारे निवृत्त सैनिकाला त्याचा व्यवसाय करण्यापासून अडविण्यात आले.
या परिपत्रकामुळे गॅस, स्टोव्ह, ग्रिलच्या मदतीने फूटपाथ, रस्त्यावर अन्न शिजवण्यापासून रोखले जात आहे. याचिकाकर्ता फूटपाथवर किंवा रस्त्यावर स्वयंपाक करत नाही तर स्टॉलमध्ये स्वयंपाक करत आहे. शिवाय, याचिकाकर्ता गॅस, ग्रिल वापरत नाही; तर इलेक्ट्रिक इंडक्शन व्हेल वापरत आहे. या परिस्थितीत, माझ्या मते, १४ ऑगस्ट २०१९ च्या आदेशाने स्टॉलमध्ये मासे तळण्याचा व्यवसाय थांबवण्यासाठी याचिकाकर्त्याला दिलेला निर्देश बेकायदेशीर आहे आणि तो परिपत्रकानुसार नाही, असे न्या. पुनीवाला यांनी म्हटले.
प्रकरण काय?
याचिकाकर्ता सिंग यांना जय जवान फूड स्टॉल चालवण्याची परवानगी होती. त्यांना फिश फ्राय विकण्याचा परवाना देण्यात आला होता. याचिकाकर्ता माजी सैनिक आहेत.
१९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धांमध्ये ते सहभागी होते आणि युद्धात ते अपंग झाले. याचिकाकर्ता वांद्रे येथील प्रसिद्ध लिंकिंग रोडवर लोकप्रिय फूड जॉइंटवर फिश फ्राय विकत आहेत, असे म्हणत न्यायालयाने पालिकेला सिंग यांना व्यवसाय करण्यापासून न अडविण्याचे निर्देश दिले.