'तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू'; उद्धव ठाकरे आक्रमक

By मुकेश चव्हाण | Published: November 27, 2020 09:04 AM2020-11-27T09:04:41+5:302020-11-27T09:15:59+5:30

मी शांत संयमी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी नामर्द आहे.

Chief Minister Uddhav Thackeray has warned the ruling party at the Center | 'तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू'; उद्धव ठाकरे आक्रमक

'तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू'; उद्धव ठाकरे आक्रमक

Next

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या एक वर्षपूर्तीनिमित्त सामनाला मुलाखत दिली. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी वर्षा ते मातोश्री, काँग्रेस-राष्ट्रवादीशी समन्वय, विरोधकांचे आरोप, सरकार चालवतानाची कसरत यासंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी शांत संयमी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी नामर्द आहे. ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबियांवर हल्ले सुरु झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. हिंदुत्त्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे, आणि तुम्ही कुटुंबावर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदुळ नाहीत, तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेवर शाब्दीक हल्ले करणाऱ्या आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला उत्तर दिलं आहे. 

दोन दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला, त्यावेळी त्यांच्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावरुनच उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे ठणकावले आहेत.  तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात, तेव्हा अशी वेसण घालावीच लागेल. ईडी काय, सीबीआय काय, त्यावर राज्याचा अधिकार नाही? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे, पूर्ण तयार आहे. पण सुडाने जायचं का?. मग जनतेनं आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची सुडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू, असा दमच उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना भरला आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हात धुवा पलिकडे काय सांगणार? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, ठिकय, हात धुतोय, जास्त अंगावर आले तर हात धुवून मागे लागेल. विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करु नका. विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला अधिक स्फूर्ती येते. कुणी कितीही आडवं आलं तर आडवं येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढं जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आडवं करायचं असेल तर बोलता कशाला? – भाजपा प्रदेशाध्यक्ष

दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरेंचे भाषण असचं झालं, शेण, गोमुत्र, आडवे करू, तिडवे करू अशी भाषा मुख्यमंत्र्यांना न शोभणारी आहे, सर्वसामान्य जनतेलाही हे योग्य नाही कळतं, आडवं-तिडवं करायचं असेल तर बोलता कशाला? गरजेल तो पडेल काय? त्यामुळे जे काही त्यांना वाटतं करावं ते करून टाकावं असं आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.

भाजपाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये-

बायका, मुलं आम्हाला पण आहे, म्हणून आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरतो या भ्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राहू नये, राज्याच्या सुव्यवस्थेकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, कोरोनाच्या संकटावर मात करावी, दात पाडू, बघून घेऊ ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? भाजपाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये असा इशारा भाजपाचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray has warned the ruling party at the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.