CoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबई महानगर क्षेत्राचा वर्षा निवासस्थानी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 01:27 IST2021-02-24T01:27:18+5:302021-02-24T01:27:33+5:30
मुख्यमंत्री म्हणाले की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत.

CoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबई महानगर क्षेत्राचा वर्षा निवासस्थानी घेतला आढावा
मुंबई : राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मंगळवारी एका बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशीदेखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्त्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळेदेखील नियमाचे पालन करीत होती आणि आतादेखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही, हे याचसाठी सांगितले, कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत. पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारीसुद्धा आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.